

Mangesh Sable Bhokardan Protest
भोकरदन : भोकरदन तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी नारायण लोखंडे व विकास जाधव उपोषणाला बसले होते. यावेळी तालुका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयात तसेच तहसीलदारांच्या कॅबिनमध्ये घुसून डफडे वाजवत आंदोलन केले होते. या प्रकरणी मंगेश साबळेसह 12 जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार अविनाश पाटील यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर नारायण लोखंडे व विकास जाधव हे दि 22 डिसेंबर पासून पंचायत समिती व तहसील कार्यालयातील बाबी संदर्भात आमरण उपोषणास बसले होते. उपोषण मागे घेण्यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही उपोषणकर्त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
दरम्यान, दि 26 रोजी कोणतीही परवानगी न घेता मंगेश साबळे (रा.गेवराई), पायगा (ता. फुलंब्री, जि. छ. संभाजीनगर) यांनी सदरील उपोषणास भेट दिली व नंतर अर्धनग्न अवस्थेत हातात डफडे घेऊन डफडे वाजवत इतर लोकांना गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांना तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे यांच्या दालनात दुपारी दोन वाजेच्या सुमारास कार्यालयीन कामकाज व सुनावणी चालू असताना बंदोबस्त वरील पोलीस हजर असताना देखील बळजबरीने विना परवानगी दालनात प्रवेश केला.
इतर नागरिकांसह गोंधळ घालून शासकीय कामकाज करीत असताना अडथळा निर्माण केला. तेव्हा मंगेश साबळे यांच्या सोबत सुनील सिरसाट (रा. वाकडी) , सुरेश रोडे (रा.कठोरा जैनपूर, नारायण सोन्नी, सुरेश तळेकर आदीवर शासकीय कामकाज करू न दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून मंगेश साबळेसह 12 जणांवर भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.