Municipal Corporation bans Ganesh idol immersion in Ghanewadi Reservoir
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयात गणेशमूर्तीचे विसर्जन करू नये, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी केले आहे. शुक्रवार, दि. २५ रोजी गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना हे आवाहन केले आहे.
घाणेवाडी जलाशयातील पाण्याचा उपयोग जालना शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. त्यामुळे जलाशयातील पाणी प्रदूषित होऊ नये तसेच नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, यासाठी जलाशयात गणेशमूर्ती विसर्जनास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, मनाई असतानाही काही नागरिकांकडून जलाशयात गणेशमूर्ती विसर्जित केल्या जात असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. यंदा जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचे संरक्षण करणे अधिक गरजेचे असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या अधिकृत विसर्जन स्थळांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. घाणेवाडी जलाशयात मनाई असतानाही विसर्जन करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध प्रचलित कायदे व नियमांनुसार गुन्हा दाखल करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे घाणेवाडी जलाशय हे जालना शहराच्या पाणीपुरवठ्याचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याची गुणवत्ता अबाधित राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशमूर्ती विसर्जन करून महापालिकेच्या अधिकृत विसर्जन स्थळांचा वापर करावा.अंजली शर्मा, आयुक्त