Message of traffic discipline conveyed through a 'Pink Helmet Rally' in Jalna
जालना, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक शिस्त आणि रस्ते सुरक्षेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी इनरव्हिल क्लब ऑफ जालना सेंट्रल आणि जालना पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने 'पिंक हेल्मेट, साधन नव्हे तर जबाबदारी!' हा जनजागृतीपर उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गुरुवारी (दि. १९ नोव्हेंबर) विशेष पोलीस महानिरीक्षक वरिन्द्र मिश्र यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ पिंक हेल्मेट रॅलीव्दारे करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे आयोजित या कार्यक्रमानंतर महिलांनी गुलाबी रंगाचे हेल्मेट परिधान करून रॅली काढली. या रॅलीच्या माध्यमातून हेल्मेटचा वापर, वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षिततेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागातून वाहतूक जनजागृतीचा हा उपक्रम शहरात सुरू झाला. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित व्हावी, यासाठी केवळ पोलीस प्रशासनावर अवलंबून न राहता नागरिकांनीही आपली जबाबदारी स्वीकारावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. त्यासाठी शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत महिलांना 'ट्रॅफिक सेफ्टी अम्बेसेडर म्हणून स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यात १०० महिलांनी या सामाजिक जबाबदारीचा स्वीकार केला असून आणखी १०० महिलांना या अभियानाशी जोडण्याचे नियोजन आहे. याशिवाय शाळा, महाविद्यालये, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी वाहतूक सुरक्षिततेविषयी प्रबोधन करणे तसेच परिसरातील वाहतूकविषयक समस्या पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे कामही या महिला करणार आहेत. स्वतः पासून कुटुंबापर्यंत आणि कुटुंबापासून समाजापर्यंत वाहतूक शिस्तीचा विचार पोहोचविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे.
या कार्यक्रमास जिल्हा पोलिस अधीक्षक तेघबिर सिंग संधू, उप विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक संदीप भारती, इनरव्हिल क्लबच्या डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी नेत्रा भक्कड, अध्यक्षा पूनम सोनी, सचिव प्रियंका लोहिया, प्रिया अबोली, हर्षा श्रॉफ, शीला भक्कड, संगीता मोतीवाला, शामा मोहता उपस्थित होते.