

Skill training for 1,380 youths in the district; employment opportunities to become available
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील १ हजार ३८० युवकांना १० विविध क्षेत्रांतील २४ अभ्यासक्रमांद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता जिल्हा कार्यकारी समितीची बैठक पार पडली.
यावेळी बैठकीस कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त जी.पी. चिमणकर, कौशल्य विकास विभागाचे उप आयुक्त विद्या शितोळे, मनपा उपआयुक्त नंदा गायकवाड, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एम. एच. केदार, उद्योजक सुनील रायठठा आदींची उपस्थिती होती. 'जालना डिस्ट्रिक्ट स्किल अँड लाईव्हलीहूड सेन्सस' हा उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.
या अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे ७० हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. विशेषतः रेशीम उद्योगाच्या विकासातून 'जालनाई सिल्क' या ब्रँडला चालना देण्यासह स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीचे नवे पर्याय उपलब्ध करून देण्याचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या बैठकीत आगामी वर्षातील प्रशिक्षण उपक्रम आणि रोजगारनिर्मितीबाबत महत्त्वपूर्ण नियोजन करण्यात आले.
लॉजिस्टिक क्षेत्रातील १८० उमेदवारांना प्रशिक्षण
जालना ड्राय पोर्टच्या माध्यमातून भविष्यात उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन लॉजिस्टिक क्षेत्रातील १८० उमेदवारांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी 'कोकून टू क्लॉथ' या उपक्रमांतर्गत ४६० उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. या प्रशिक्षणामुळे रेशीम उत्पादनापासून वस्त्रनिर्मितीपर्यंतच्या विविध प्रक्रियांमध्ये स्थानिक युवकांना कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.