जालना : आंतरवाली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर अवघ्या काही वेळात तालुक्यातील नाव्हा परिसरात असलेल्या समृध्दी महामार्गावर मराठा समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे यामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे रखरखत्या उन्हात आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर उतरून अचानक रास्ता रोको आंदोलन केले.
हातात भगवे झेंडे घेऊन महामार्गाच्या मध्यभागी झालेल्या या आंदोलनामुळे समृद्धी महामार्गावरील हाय-स्पीड वाहतूक पूर्णपणे कोलमडून गेली होती. आंदोलकांनी यावेळी आरक्षण आमच्या हक्काचे! “मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है!“ यासह विविध घोषणा दिल्याने महामार्ग परिसर घोषणांनी दुमदुमला.
यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. माहामार्ग सुरक्षा पोलिस आणि स्थानिक प्रशासनाची अचानक झालेल्या या आंदोलनामुळे धावपळ उडाली. सुमारे 10 ते 15 मिनिटे चाललेल्या या आक्रमक आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संतप्त आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत आगपाखड केली. आंदोलक म्हणाले की, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे आणि सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील प्राणांची बाजी लावून लढत आहेत. आम्ही आमच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकारलाच जाब विचारणार, मात्र हे निर्दयी सरकार दरवेळी केवळ तोंडी आश्वासने देऊन वेळ काढूपणा करत आहे.
सरकार ठोस आणि कायदेशीर निर्णय घेत नसल्यानेच आज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा या जीवघेण्या उन्हात उपोषणाला बसावे लागत आहे. जोपर्यंत सरकार लेखी निर्णय देत नाही, तोपर्यंत जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आम्ही संपूर्ण महाराष्ट्र ठप्प करू, असा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिल्याचे पहावयास मिळाले.
पोलिसांची मध्यस्थी
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी समृद्धी महामार्ग रोखल्यामुळे हे आंदोलन आगामी काळात अधिक उग्र रूप धारण करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर महामार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने पुन्हा पूर्ववत करण्यात आली.