Manoj Jarange-patil 
जालना

Manoj Jarange-patil Statement : शेतकरी मेळावा रद्द न केल्याचे परिणाम बंडू जाधवांना भोगावे लागतील : मनोज जरांगे

Antarwali Sarati Protest Jalna: परभणीतील मेळाव्यावरून जरांगे आक्रमक; एकनाथ शिंदेंनाही इशारा

पुढारी वृत्तसेवा

वडीगोद्री : मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे एकवटलेला असताना परभणी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला शेतकरी मेळावा रद्द करावा, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी खासदार बंडू जाधव यांच्याकडे केली होती. मात्र, मेळावा रद्द न करता तो घेण्यात आल्याने जरांगे यांनी खासदार जाधव यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत, या भूमिकेचे गंभीर परिणाम आगामी काळात त्यांना भोगावे लागतील, असा इशारा दिला.

रविवारी(दि. ३०) सकाळी ११ वाजता मनोज जरांगे यांनी मोबाईलवरून खासदार बंडू जाधव यांच्याशी संवाद साधला. मराठा समाजाचा सन्मान राखत मेळावा रद्द करण्याची सूचना त्यांनी केली. मात्र, त्यानंतरही मेळावा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

‘समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असताना मेळावे घेणे योग्य नाही’

मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर आंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने एकत्र आला आहे. अशा परिस्थितीत समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याऐवजी परभणीत मेळावा आयोजित करण्यात आल्याबद्दल जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणीत आले, मात्र आंतरवाली सराटीकडे फिरकले नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी

खासदार बंडू जाधव यांनी मेळावा रद्द न करण्याचा निर्णय घेतल्याने ही त्यांच्या राजकीय आयुष्यातील मोठी चूक ठरेल, असे सांगत आगामी काळात त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा जरांगे यांनी दिला. एकनाथ शिंदे यांनाही याचे परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी म्हटले. दरम्यान, जरांगे यांच्या समर्थकांनी परभणी गाठण्याची तयारी केली होती. कार्यकर्त्यांकडून वाहनांचीही तयारी करण्यात आली होती. उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून खासदार बंडू जाधव यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत असल्याचे चित्र आहे.

मराठा समाजाच्या भूमिकेचाही अवमान...

गोरगरीब मराठा जनतेने मतदान करून बंडू जाधव यांना निवडून दिले. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलल्याने जनतेच्या मताचा अपमान झाला, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. आता मराठा समाजाच्या भूमिकेचाही अवमान झाल्याचे सांगत आगामी काळात समाज आपली भूमिका स्पष्टपणे दाखवून देईल, असा इशारा त्यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT