Manoj Jarange Patil Eknath Shinde  Pudhari
जालना

Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदेंचा परभणीतील कार्यक्रम रद्द करा! जरांगेंचा बंडू जाधवांना थेट फोन; ‘अन्यथा मी....’

Manoj Jarange Patil Eknath Shinde Parbhani Rally: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणीतील शिवसेना मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असून, त्यांनी खासदार बंडू जाधव यांना फोन केल्याची माहिती आहे.

Rahul Shelke

Manoj Jarange Patil Eknath Shinde Parbhani Rally: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शिवसेनेचा मेळावा रद्द करण्याची मागणी करत जरांगे पाटील यांनी परभणीचे खासदार बंडू जाधव यांना थेट फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परभणीत शिवसेनेच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याने जरांगे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी खासदार बंडू जाधव यांना कार्यक्रम रद्द करण्याची सूचना केल्याचे सांगण्यात येत आहे.

‘पाच मिनिटांत कार्यक्रम रद्द करा’

जरांगे पाटील यांनी फोनवरून बंडू जाधव यांना कार्यक्रम रद्द करण्यास सांगितल्याचा दावा करण्यात आला आहे. “कार्यक्रम रद्द करा, तुम्हाला गोंधळ घडवायचा आहे का? मला सांगू नका,” अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे.

कार्यक्रम रद्द न केल्यास आपण स्वतः तिथे येऊ, असा इशाराही जरांगे यांनी दिल्याची माहिती आहे. “तो कार्यक्रम रद्द करा, अन्यथा मी तिथे येईन. मी अजून कुणावर चाल करून गेलेलो नाही,” असे जरांगे यांनी म्हटल्याचे सांगितले जात आहे.

‘राज्यात धिंगाणा घडवून आणायचा आहे का?’

शिवसेनेच्या मेळाव्यामुळे राज्यातील वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याचा दावा करत जरांगे पाटील यांनी कार्यक्रम आयोजकांवर नाराजी व्यक्त केली. “पाच मिनिटांत कार्यक्रम रद्द करा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला राज्यात धिंगाणा घडवून आणायचा आहे का?” असा सवाल त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, कार्यक्रम रद्द न केल्यास परिस्थिती चिघळू शकते, असा इशाराही त्यांनी दिल्याचे समोर आले आहे.

‘एकनाथ शिंदेंनी मराठवाड्यात येऊ नये’

मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारकडून ठोस निर्णय होईपर्यंत एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात येऊ नये, अशी भूमिका जरांगे पाटील यांनी व्यक्त केली. चार रद्द केलेल्या प्रमाणपत्रांबाबतचा निर्णय होईपर्यंत शिंदे यांनी मराठवाड्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.

जरांगे पाटील यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बंडू जाधव यांना थेट फोन

विशेष म्हणजे, नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलेले परभणीचे खासदार बंडू जाधव यांनाच जरांगे पाटील यांनी थेट फोन करून कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे.

आता या मागणीवर खासदार बंडू जाधव आणि शिवसेनेकडून काय भूमिका घेतली जाते, तसेच एकनाथ शिंदे यांचा परभणीतील कार्यक्रम नियोजित वेळापत्रकानुसार होतो की त्यात काही बदल केला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT