जिल्हाधिकारी आशिमा मित्तल pudhari photo
जालना

Soil and Water Conservation Works : मृद, जलसंधारण योजनांची सर्व कामे वेळेत पूर्ण करा

गाळमुक्त धरण बैठकीत जिल्हाधिकारी यांचे निर्देश

पुढारी वृत्तसेवा

जालना : शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण या दोन्ही योजना कायमस्वरुपी राबविण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या दोन्ही योजना ग्रामीण भागातील जलसंधारणासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या योजनांचे मुख्य उद्दिष्ट भूजल पातळी वाढवणे आणि शेतीसाठी पाण्याचा शाश्वत स्त्रोत निर्माण करणे हे आहे. तरी मृद व जलसंधारण योजनांची सर्व कामे विहीत वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शुक्रवार (9) रोजी सकाळी 11 वाजता गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस.एस.वाघमारे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही.ढोबळे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, सामुहिक शेततळे, बांधबंदिस्ती, फळबाग लागवड योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे, प्रलंबित कामे तत्परतेने पूर्ण करावी. खोलीकरणामुळे पाणी जमिनीत जिरण्याचे प्रमाण वाढेल, ज्याचा फायदा परिसरातील विहिरींना होईल. जिल्ह्यातील टँकरमुक्त गावे करण्यासाठी पाण्याचा साठा अत्यंत महत्वाचा आहे.

ग्रामस्तरीय ग्रामरोजगार सेवकांना योग्य प्रशिक्षण देवून प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.गाळ काढण्यासाठी व नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी यंत्रसामुग्री व इंधन खर्च यासाठी 31 रुपये प्रति घ.मी. दर अदा करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना गाळ वाहून नेण्यासाठी अनुदान 35.75 रुपये प्रति घ.मी. हे फक्त गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसाठी लागू राहील.

जिल्हास्तरीय समितीकडून कार्यपध्दतीप्रमाणे काम करणे व अवनी ग्रामीण ॲपनूसार वेळोवेळी आढावा घेण्यात येत असतो. 2025-26 या आर्थिक वर्षात 40 कामे पूर्ण झाली असून 400936 घ.मी. गाळ काढण्यात आलेला आहे. सन 2025-26 अंतर्गत पूर्ण झालेल्या 40 कामांची 272.53 लक्ष रुपये इतकी निधी मागणी व सन 2024-25 अंतर्गत 9 कामांची 47.52 लक्ष रुपये असे 49 कामांची 320.05 लक्ष इतकी निधी मागणी शासनास सादर करण्यात आली आहेत.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा आराखडा सादर करण्यात आलेला आहे. यामध्ये चालू व मागील वर्षातील जलाशयातील कामे कामांची संख्या 80, गाळ परिमाण 863.97 स.घ.मी. तर रक्कम 609.94 लक्ष रुपये एवढी आहे.

आगामी वर्षातील गाळमुक्त धरणाची जलाशयातील कामे कामांची संख्या 724, गाळ परिमाण 8358 स.घ.मी. तर रक्कम 6131.96 लक्ष रुपये एवढी आहे. तसेच चालु व मागील वर्षातील नाला खोलीकरणाची कामे घेण्यात आलेली नाही. आगामी वर्षात नाला खोलीकरण व रुंदीकरणाची कामे राबविण्यात येणार आहेत, यामध्ये कामांची संख्या 271, गाळ परिमाण 6425.78 स.घ.मी. तर रक्कम 2430.23 लक्ष रुपये एवढी असणार आहे. अशी माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे देण्यात आली.

  • 2025-26 या आर्थिक वर्षात 40 कामे पुर्ण झाली असून 400936 घ.मी. गाळ काढण्यात आलेला आहे. 2025-26 अंतर्गत पूर्ण झालेल्या 40 कामांची 272.53 लक्ष रुपये इतकी व 2024-25 अंतर्गत 9 कामांची 47.52 लक्ष रुपये आशा 49 कामांची 320.05 लक्ष इतकी निधी मागणी शासनास सादर करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT