Kharif crops completely destroyed due to heavy rains and floods, farmers in Diwali crisis
अविनाश घोगरे
घनसावंगी : दिव्यांचा आणि आनंदाचा सण दीपावली काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, तालुक्यात अतिवृष्टी आणि महापुराचे सावट गडद झाले झाले होते. गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले, तर ग्रामीण भागात पिके पूर्णतः वाहून गेली. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडली असून, त्यांच्या आयुष्यातील दिवाळी या वर्षी अक्षरशः अंधारमय झाली आहे.
सलग पावसामुळे शेतकऱ्यांच्या शिवारातील कपाशी, सोयाबीन, तूर, मका यांसारखी खरीप पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. "कपाशीच्या पहाट्या, तुरीच्या तु-हाट्या आणि सोयाबीनच्या घुगऱ्या झाल्या," अशी व्यथा शेतकरी व्यक्त करत आहेत. काही ठिकाणी जनावरांसाठी चारा नाही, तर काही ठिकाणी जनावरे पूरात वाहून गेली आहेत. त्यामुळे शेतीसह पशुधनही उद्ध्वस्त झाले आहे. यंदा घरचा कापूसच नसल्यानं दिव्यांच्या वातीसाठीही शेतकऱ्यांकडे साधन नाही.
पूर गेल्यानंतरही शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र ओसरलेल्या नाहीत. पिकांसोबतच घरांमध्येही पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मातीची भिंत कोसळून काही ठिकाणी घरं पडली, तर काही ठिकाणी संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. महापुरानंतर गावागावात दुर्गंधी, आजारपण आणि अन्नधान्याचा तुटवडा अशी तिहेरी संकटे उभी राहिली आहेत.
दरवर्षी दीपावलीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा ग्राहकांनी गजबजलेल्या असतात; परंतु यंदा परिस्थिती पूर्णतः उलट आहे. तालुक्यांतील बाजारपेठांमध्ये दिवाळी खरेदीचा उत्साहच दिसत नाही. ग्राहक नसल्याने व्यापाऱ्यांचे व्यवसाय कोलमडले आहेत. इलेक्ट्रॉनिक पणत्या, मातीचे दिवे, मिठाई, कपडे यांची दुकाने ओस पडलेली दिसत आहेत. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामे सुरू झाले असले तरी मदत पोहोचण्याचा वेग अत्यंत संथ आहे.
शेतकरी संघटनांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसनाची मागणी केली आहे. "पिकं गेली, जनावरांसाठी चारा नाही, घरात सण कसला?" अशा शब्दांत शेतकऱ्यांची व्यथा दाटून येते. अनेक शेतकरी शासनाकडे मदतीची आस लावून बसले आहेत. गोदावरीचा पाणीपातळीत घट झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मनातील वेदना आणि हतबलतेचा पूर कायम आहे. या वर्षीचा दीपावली सण ग्रामीण भागात प्रकाशाऐवजी संकटाची सावली घेऊन आला आहे. उत्सवाच्या रोषणाईऐवजी शेतकऱ्यांच्या घरात मात्र अंधार पसरला आहे.
'सगळं पिक वाया गेलं इतका पाऊस पडला की शिवारात उभं राहायचीही जागा उरली नाही. कपाशी, तूर, सोयाबीन काहीच शिल्लक नाही. हातात काहीच राहिलं नाही. मुलं म्हणतात 'दिवाळी आली बाबा!' पण माझ्या मनात मात्र अंधार पसरलाय. एवढ्या वर्षांत इतकी हतबल दिवाळी कधी पाहिली नव्हती."-शाम उढाण, शेतकरी बाणेगाव
सकाळी त्या पांढऱ्या फुलांनी भरलेल्या शेतात गेलं की मन आनंदानं भरून यायचं. वाटायचं, यंदा चांगलं पीक येईल, घरात आनंद येईल. पण आता तिथं फक्त पाणी, चिखल आणि उद्ध्वस्त झालेली स्वप्नं दिसतात.-बबन भालेकर, शेतकरी रामसगाव