टेंभुर्णीः जीवरेखा धरणात केवळ दीड फुट पाणीसाठा उरला आहे.  (छायाः रावसाहेब अंभोरे)
जालना

Jalna Jivreka Dam water level : जीवरेखा धरण आटण्याच्या मार्गावर, केवळ दीड फूट पाणीसाठा शिल्लक

भविष्यात पाणी टंचाईचे संकट गडद, पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर येणार

पुढारी वृत्तसेवा

रावसाहेब अंभोरे

टेंभुर्णीः जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील ५०० एकर पाणलोट क्षेत्र असलेले जीवरेखा धरण केवळ १०-१५ एकरावर आले आहे. सुमारे १६ फूट क्षमतेच्या धरणात आता केवळ दीड फुट पाणी शिल्लक राहिल्याने येत्या काळात पिण्यासह सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे चिन्हे दिसत आहे.

१५ गावांची जीवनरेखा असलेले हे धरण सध्या पूर्णपणे कोरडेठाक पडण्याच्या मार्गावर आहे. जुलै अखेरपर्यंत या परिसरात केवळ १३८ मिमी पाऊस पडला आहे. तर मागच्या वर्षी जुलै अखेरपर्यंत ४०० मीमी पाऊस पडला होता आणि वर्षभरात एकूण १०२१ मीमी (जवळजवळ १ मीटर) पाऊस झाला होता. त्यामुळे धरण महिनाभर ओव्हरफ्लो होऊन सांडव्यावरून पाणी वाहत होते. परंतु यावर्षी स्थिती अत्यंत गंभीर आहे.

५०० एकर पेक्षा जास्त पाणलोट क्षेत्र असलेल्या या धरणात आज केवळ १०-१५ एकराच्या आसपासच पाणी शिल्लक आहे. जिथे गेटमध्ये १६ फुटाचा पाणीसाठा असतो आणि नदीच्या पात्रात २० ते २२ फूट पाणी असते, तिथे आज नदीच्या पात्रातच केवळ दीड फूट पाणी शिल्लक आहे. यावर्षी ४५ अंश सेल्सियस पर्यंत तापमान वाढल्याने धरण झपाट्याने ड्राय होत गेले.

२१ सप्टेंबर अखेर जीवरेखा धरणाच्या तळाशी केवळ पाच टक्के ऐवढेच पाणी साठा उपलब्ध आहेत. यामुळे परतीच्या प्रवासाला जोरदार पाऊस पडला तर रब्बी हंगामातील पिकांचे व गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

५० ते ६० हजार लोकांवर संकट

या धरणावर टेंभुर्णी, अकोला देव, गणेशपूर, गाडेगव्हाण, आंबेवाडी, डोणगाव, पोखरी, बुटखेडासह जवळजवळ १० गावांच्या पाणी पुरवठा विहिरी अवलंबून आहेत. तसेच टेंभुर्णी व जाफ्राबाद, खामखेड परिसरातील शेती सिंचनासाठी याच धरणाचे पाणी जाते. त्यामुळे ५० ते ६० हजार लोकांना पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा मोठा प्रश्न भेडसावणार आहे.

पूर्वी इरिगेशन डिपार्टमेंटकडून रोटेशन पावत्या दिल्या जायच्या, तारखा टाकल्या जायच्या. काळ बदलत गेला, पाईपलाईन झाल्या, विजेचा प्रसार झाला आणि पावत्या देणे बंद झाले, त्यामुळे इरिगेशनचा कंट्रोलच गेला. सरकारी कर्मचारी कमी झाले, धरणाची झाडाझुडपांची छाटणी ठेकेदारी पद्धतीने केली जायची, कामगार लावले जायचे, पण आता सरकार त्याकडे कानाडोळा करत आहे.
भाऊराव आटपळे, भूजलतज्ञ.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT