

भोकरदन : भोकरदन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव येथे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधपणे विक्रीसाठी नेला जाणारा बंदी असलेला सुगंधित पानमसाला, जर्दा आणि दुचाकी असा एकूण ७५,५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध पोलीस ठाणे भोकरदन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी विनोद किष्टु ओसावार (वय २९) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास तडेगाव जाणाऱ्या रस्त्यावर आरोपी दुर्गासिंग देवसिंग मरमट (वय २३) आणि सलमान खान शोएब खान (वय २३, दोघे रा. चांदोळ, ता. जि. बुलढाणा) हे दोघे आपल्या 6 विनाक्रमांकाच्या बजाज मोटारसायकलवरून राज्य शासनाने बंदी घातलेला अन्नपदार्थ, राजनिवास सुगंधित पानमसाला व जाफरानी जर्दा विक्रीसाठी घेऊन जात असताना रंगेहात पकडण्यात आले.
या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत. या कारवाईमुळे गुटखामाफियांचे धाबे दणाणले आहे.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल
राजनिवास सुगंधित पानमसाला (२५ पुडे) - ३,७५० रुपये, झेड एन ०१ जाफरानी जर्दा (२५ पुडे) - २,४०० रुपये,विमल पान मसाला (२० पुडे) - ३,५२० रुपये, तंबाखू (२० पुडे) - ८८० रुपये,विमल पान मसाला बिग पॅक (२० पुडे) - ४,८०० रुपये,वि-१ बिग तंबाखू (१० पुडे) - २०० रुपये, काळ्या रंगाची विनाक्रमांकाची बजाज १५० सीसी दुचाकी - ६०,००० रुपये एकूण मुद्देमाल: ७५,५५० रुपये.