जालना ः जामवाडी शिवारात उसाला लागलेली आग. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.  pudhari photo
जालना

Jalna sugarcane field fire : जामवाडी शिवारात उसाला आग; दोन एकर पीक जळून खाक

अग्निशमन दलाच्या तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना - देऊळगावराजा मार्गावरील जामवाडी शिवारात उसाच्या शेताला भीषण आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना बुधवार, दि. 6 रोजी दुपारी घडली. माऊली हॉटेलच्या पाठीमागील परिसरात दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.

मे महिन्यातील तीव्र उष्णतेमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. काही क्षणांतच उसाच्या शेताने वणव्याचे रूप धारण केले. स्थानिक नागरिकांनी बोअरवेलच्या पाईप व बादल्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र तीव्र वारा आणि उष्णतेमुळे आग झपाट्याने पसरत गेली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

या आगीत शेतकरी सुधाकर पाटीलबा वाढेकर यांचा सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस पूर्णतः जळून खाक झाला असून अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे अशा आगींच्या घटनांत वाढ होत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT