Jalna's play 'Ti' awarded first prize at the Amateur State Drama Competition
जालना, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ६४व्या राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा पारितोषिक वितरण सोहळा ३० जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथील तापडिया रंगमंदिर येथे दिमाखात संपन्न झाला.
या सोहळ्यात नाट्यांकुर व उत्कर्ष थिएटर्स जालनाच्या 'ती' या नाटकाला प्रथम क्रमांकाचे ८० हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, तसेच अभिनयासह एकूण आठ पारितोषिके प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ रंगकर्मी जयंत शेवतेकर, प्रा. योगिता महाजन, प्रेषित रुद्रवार, पद्मनाभ पाठक, रविप्रकाश कुलकर्णी आर्दीच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
सतीश लिंगडे लिखित व सुमित शर्मा दिग्दर्शित 'ती' हे नाटक छत्रपती संभाजीनगर केंद्रावर १७ नोव्हेंबर रोजी तापडिया नाट्यमंदिर येथे सादर झाले होते. स्पर्धा ६ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संपन्न झाली. किन्नर व तृतीयपंथियांच्या समस्या मांडणाऱ्या 'ती' या नाटकासाठी उत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम सुमित शर्मा, उत्कृष्ट अभिनय सुमित शर्मा, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र सतीश लिंगडे, अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र कपिल रोडगे, उत्कृष्ट रंगभूषा प्रथम वर्षाराणी कोळवले, वेशभूषा दुसरे पारितोषिक संध्या शर्मा, पार्श्वसंगीताचे दुसरे पारितोषिक नीलेश सपकाळ यांनी जिंकले आहे.
नेपथ्य मिलिंद दुसे व प्रत्यक्ष संगीत आनंद घुले व आदित्य मुदिराज यांचे होते. या नाटकात सुमीत शर्मा, सतीश लिंगडे, सुंदर कुँवरपुरिया, विनोद जैतमहाल, मिलिंद दुसे, कपिल रोडगे, रेखा चव्हाण, गौरी गिल्डा, सानवी संबरकर, प्रेरणा सराफ, आकाश ओहाळ, गणेश लोखंडे, पवनकुमार खांदे, अमोल सराटे, सोहन भुरेवाल, आनंद घुले या कलावंतांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.
या यशाबद्दल नाट्यांकुर संस्थेचे अध्यक्ष ध. स. जैन, सचिव सुंदर कुँवरपुरिया, जयेश पहाडे, कवी प्रा. डॉ. दासू वैद्य, जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, डॉ. यशवंत सोनुने, डॉ. सुहास सदाव्रते, उद्योजक सुनील रायठठ्ठा, अरुण अग्रवाल, डॉ. संजीवनी तडेगावकर, डॉ. प्रभाकर शेळके आदींनी अभिनंदन केले आहे.
त्यांनाही आत्मसन्मान आहे
तृतीयपंथीय, किन्नर हे सुद्धा समाजाचा एक भाग आहेत, देशाचे नागरिक आहेत आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाची वागणूक देणे आवश्यक आहे. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रचलित कायद्यात बदल करणे किंवा नवे कायदेही करावे लागतील. त्यांना भीक नको तर आत्मसन्मानाने रोजगाराची संधी मिळावी असे अनेक मुद्दे 'ती' या नाटकातून लेखक सतीश लिंगडे यांनी मांडले आहेत. हे नाटक सादर होत असताना क्षणोक्षणी प्रेक्षक प्रतिसाद देत होते आणि नाटक पाहून आमचा दृष्टिकोन बदलला अशा प्रतिक्रियासुद्धा अनेकांनी व्यक्त केल्या.