Fire Safety System pudhari photo
जालना

Jalna Zilla Parishad : अग्निसुरक्षेचा सहा वर्षांचा वनवास संपला; यंत्रणा अद्ययावत

‘मिनी मंत्रालयाला’ आली जाग; कार्यालयातील कालबाह्य अग्निशामक बंब ‘रिफिल’

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या दुरवस्थेकडे अखेर प्रशासनाचे लक्ष गेले आहे. इमारतीतील कालबाह्य झालेली अग्निशामक यंत्रणा अद्ययावत करण्यात आली असून, सर्व अग्निशामक बंबांचे ‘रिफिलिंग’ करून ते योग्य ठिकाणी बसविण्यात आले आहेत. यासाठी अर्थसंकल्पातून सुमारे चार लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

दरम्यान, जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय इमारतीत मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांची दररोज ये-जा असते. अशा परिस्थितीत इमारतीतील अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम असणे आवश्यक आहे. ही बाब दै. पुढारीने पाठपुरावा करून जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिली होती. आता अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. या इमारतीतील दोन मजल्यांवर सन २०१९ मध्ये अग्निशामक बंब बसविण्यात आले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षे या यंत्रणेच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले.

नियमानुसार अग्निशामक बंबांचे ठराविक कालावधीनंतर रिफिलिंग करणे आवश्यक असते. मात्र, संबंधित यंत्रांचे वेळेत रिफिलिंग न झाल्याने त्यांची कार्यक्षमता आणि वैधता धोक्यात आली होती. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत ही यंत्रणा कितपत उपयोगी ठरेल, असा प्रश्न निर्माण झाला होता.

या प्रकरणाकडे लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर दखल घेतली. बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली. अर्थसंकल्पातून चार लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर जालना शहरातील ‘विश्वास फायर सर्व्हिसेस’ या अधिकृत एजन्सीच्या माध्यमातून जिल्हा परिषद मुख्य प्रशासकीय इमारतीतील संपूर्ण अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत करण्यात आली.

अग्निशामक बंबांचे रिफिलिंग करून ते आवश्यक त्या ठिकाणी बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीला अग्निसुरक्षेचे कवच मिळाले आहे.

नागरिक-कर्मचाऱ्यांची दररोज वर्दळ

जिल्हा परिषद मुख्य इमारतीत दररोज शेकडो नागरिक आणि कर्मचारी ये-जा करतात. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी निश्चित करण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत केली आहे.

‘अर्थसंकल्पातून चार लाखांची तरतूद’- जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामध्ये अग्निशामक यंत्रणेसाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार तातडीने प्रक्रिया राबवून अधिकृत एजन्सीमार्फत इमारतीतील सर्व अग्निसुरक्षा यंत्रणा अद्ययावत व कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्व बंबांचे रिफिलिंग करून ते योग्य ठिकाणी बसविण्यात आले आहेत.
लक्ष्मीकांत राजपूत, प्रभारी कार्यकारी बांधकाम विभाग, जि. प. जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT