अबब..! एमआयडीसीला दररोज होतोय 4 एमएलडी पाणीपुरवठा pudhari photo
जालना

Jalna water crisis : अबब..! एमआयडीसीला दररोज होतोय 4 एमएलडी पाणीपुरवठा

वर्षाला पावणे तीन कोटी पाणीपट्टी, शहराची गरज 60 दशलक्ष लिटर, पुरवठा केवळ 18 दशलक्ष

पुढारी वृत्तसेवा

जालना ः येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीला दररोज 4 दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केल्या जातो. वर्षाला तब्बल 146 कोटी लिटर पाणी एकट्या एमआयडीसीला पुरवण्यात येते. त्यापोटी वर्षाला पावणे तीन कोटी रुपये पाणीपट्टी वसुल केल्या जाते. तर वाढलेल्या शहराला दररोज 60 दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना केवळ 18 दशलक्ष लिटरच पाणी पुरवठा केला जात असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जालना एमआयडीसीला दररोज 4 एमएलडी (म्हणजेच 40 लाख लिटर) पाणीपुरवठा होत असला तरी वर्षभरात हीच गरज तब्बल 146 कोटी लिटरांपर्यंत पोहोचते. छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधून जालना एमआयडीसीला पाणीपुरवठा केला जातो. औद्योगिक उत्पादन वाढीसोबत पाण्याची मागणी सातत्याने वाढत असून, या प्रचंड वापरामुळे जलस्रोतांवर ताण निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

एमआयडीसीला महिन्याभरातच 12 कोटी लिटर पाण्याचा वापर होतो, यावरून उद्योगांची पाण्यावरची अवलंबित्व स्पष्ट होते. जालना एमआयडीसीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा यंत्रणा अस्तित्वात असूनही काही उद्योगांकडून नियमबाह्य पद्धतीने पाण्याचा वापर सुरू असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.दरेगाव येथील काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात, काही उद्योगांनी परिसरातील गावांमधील जलस्रोत तसेच पाझर तलावातून छुप्या पाईपलाईनद्वारे पाणी उचल सुरू केल्याचा आरोप केला आहे.

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांच्या पाणीहक्कांवर परिणाम होत असून, ग्रामीण भागात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

असे आहेत दर

पाणीपट्टी दर : 1,000 लिटर मागे 18.75

खर्च : दररोज : 75 हजार रुपये

30 दिवस : 22 लाख 50 हजार रुपये

365 दिवस : 2. कोटी 73 लाख रुपये

शेंद्रा येथून पाणीपुरवठा - जालना येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीला छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडून स्वतंत्र पाणी पुरवठा केला जातो. दररोज 4 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. यासाठी 18.75 रुपये (1 हजार लिटरला) दर आकाराला जातो. -
अजय किंगरे, कनिष्ठ अभियंता, एमआयडीसी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT