भोकरदन: पुढारी वृत्तसेवा : रात्री आपले काम आटोपून घरी जात असताना दोघांचा पाठलाग करून अडवले आणि बॅग दे नाहीतर तुला चाकु मारतो, असे म्हणून बॅगेतील २ लाख ३२ हजार २६५ रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले आहे. ही घटना भोकरदन शहराजवळील विरेगाव येथील मंदिर परिसरात शनिवारी (दि.१४) रात्री ११ च्यादरम्यान घडली.
भोकरदन येथे महेंद्र जयस्वाल (रा. औरंगाबाद) यांचे बरजोर ॲन्ड सन्स वाईन शॉपचे दुकान आहे. येथे मॅनेजर म्हणून रविंद्र कल्याणकर (वय ३१, रा.विरेगाव) हे मार्च २०२३ पासून काम करतात आणि नेहमीप्रमाणे ते रोज सकाळी दहा वाजता दुकान उघडता आणि संध्याकाळी दिवसभराचा हिशोब करुन दुकानचे मालक महेंद्र जयस्वाल यांना फोन करुन सांगतात. कल्याणकर हे नेहमीसारखे वाईन शॉपमध्ये जमा झालेली दिवसभराची जमा झालेली कॅश विरेगाव येथे घेवून जात असतानात्यांचा एका अज्ञात चार चाकी वाहनाने पाठलाग करून विरेगावात अडविले आणि त्यांच्या जवळची दोन लाख 32 हजार रुपयांची बॅग घेऊन पसार झाले. या चोरीने खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती रविंद्र कल्याणकर यांनी मालकाना सांगून भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान रविंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा