'जागर शिवशाहीचा' जालनाकर भारावले ! file photo
जालना

'जागर शिवशाहीचा' जालनाकर भारावले !

शिवजयंती : शाहिरी कडाडली आणि अंगावर शहारे उमटले..!

पुढारी वृत्तसेवा

jalna shivjayanti news

जालना, पुढारी वृत्तसेवा: गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जागर शिवशाहीच्या कार्यक्रमाने जालनाकर भारावून गेले. बुधवार दि. १८ रोजी शाहीर अजिंक्य लिंगायत व त्यांच्या ११ कलावंत आणि गुरुवार, १९ रोजी शाहीर रामानंद उगले आणि त्यांच्या चमुने सादर केलेल्या 'जागर शिवशाहीचा' या कार्यक्रमाने जालनेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. डफावर थाप पडली, तुणतुण्याचा सूर छेडला गेला आणि 'छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही घ्या मानाचा मुजरा' या ललकारीने टाऊन हॉलचा परिसर शिवमय झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जालना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन हॉल, येथे १८ आणि १९ रोजी भव्य सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा जागर पहायला मिळाला.

छत्रपती शिवरायांच्या बाललीलांचे वर्णन करणाऱ्या 'गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या' या शिवपाळण्याने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. 'छत्रपती शिवाजी जाहले' हे शिवराज्याभिषेक गीत. या गीतावेळी शाहिरांचा बुलंद आवाज आणि वाद्यांची साथ यामुळे अंगावर रोमांच उभे राहिले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक गोंधळाने झाली. 'गोंधळाला ये' आणि 'दार उघड बया आता दार उघड...' या गीतांनी सभागृहात चैतन्य निर्माण केले. केवळ गाणीच नव्हे, तर विस्मृतीत चाललेल्या 'तुमडी' या कलाप्रकाराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला' या गाण्यासोबतच कलाकारांनी सादर केलेली युद्धकला आणि लढतीची प्रात्यक्षिके पाहून प्रेक्षक थक्क झाले महापौर वंदना मगरे आणि उपमहाप राजेश राऊत यांच्या उपस्थिती रंगलेल्या या सोहळ्यात शाहिरी परंपरेतून शिवरायांचे शौर्य मांडण्या आले.

शाहिरीतून मांडला शौर्याचा इतिहास

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास शाहिरी परंपरेतून आज जिवंत करण्यात आला. पोवाडे, भारूडे आणि जाज्वल्य घोषणांतून शिवरायांचे शौर्य, स्वराज्याची तळमळ आणि अन्यायाविरुद्धचा लढा प्रभावीपणे उभा शाहीर अजिंक्य लिंगायत यांनी उभा केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यक्तिमत्त्व केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रभक्तीचे जिवंत प्रतीक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT