Jalna retired employee protest pudhari photo
जालना

Jalna retired employee protest : प्रशासकीय दिरंगाईचा ‌‘आहेर‌’; हक्काच्या पेन्शनसाठी उपोषण

दोन वर्षे उलटली तरी पेन्शन मिळेना; दोन दिवसांपासून उपोषण

पुढारी वृत्तसेवा

जालना ः सेवेतून निवृत्त होऊन दोन वर्षे उलटली तरी पेन्शन आणि हक्काचे आर्थिक लाभ मिळत नसल्याने संतापलेल्या एका सेवानिवृत्त आरोग्य सहायकाने अखेर प्रशासनाविरुद्ध उपोषणाचे हत्यार उपसले आहे. सर्जेराव आहेर यांनी सोमवार (दि. 11) पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

सर्जेराव आहेर हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. सप्टेंबर 2023 मध्ये ते वयोमर्यादेनुसार सेवानिवृत्त झाले. नियमानुसार निवृत्तीनंतर 30 दिवसांच्या आत सर्व देयके मिळणे अपेक्षित असताना, आज दोन वर्षे उलटूनही त्यांना पेन्शन, भविष्य निर्वाह निधी, गट विमा आणि ग्रॅच्युइटी यांपासून वंचित राहावे लागले आहे. 2005 पूर्वी सेवेत रुजू होऊनही प्रशासकीय दिरंगाईमुळे त्यांना या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आहेर यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मुलांचे शिक्षण, दैनंदिन घरखर्च आणि वाढते वय पाहता आरोग्याचा खर्च भागवताना त्यांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा लेखी निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासने मिळाल्याचा आरोप आहेर यांनी केला आहे.

प्रशासकीय संवेदना हरवली?

महाराष्ट्र नागरी सेवा पेन्शन नियमांची पायमल्ली करणाऱ्या प्रशासनाविरुद्ध आता संताप व्यक्त होत आहे. “मी आयुष्यभर शासनाची सेवा केली, पण आज स्वतःच्या हक्काच्या पैशांसाठी मला रस्त्यावर बसावे लागत आहे, ही मोठी शोकांतिका आहे,” अशा भावना आहेर यांनी व्यक्त केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT