Jalna Rain News : दडी मारलेल्या पावसाची हजेरी; सरींनी खरीप पिकांना दिलासा file photo
जालना

Jalna Rain News : दडी मारलेल्या पावसाची हजेरी; सरींनी खरीप पिकांना दिलासा

जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली.

पुढारी वृत्तसेवा

Jalna Rain News : heavy rain; Rains bring relief to Kharif crops

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने बुधवारी हजेरी लावली. मंठा व भोकरदन तालुका वगळता जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील काही भागांत रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडल्याने कोमेजू लागलेल्या खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, जिल्ह्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे.

जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत मागीलच चोवीस तासांत सरासरी ८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. १ जून ते १६ जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी २२३ मि.मी. पाऊस पडला आहे. अपेक्षित पावसाच्या १०२.१ टक्के पाऊस झाला असला तरी वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो केवळ ३७ टक्के पडल्याने जलसाठ्याबाबतची चिंता अद्याप कायम आहे.

बुधवारी सर्वाधिक २३.४ मि.मी. पावसाची नोंद बदनापूर तालुक्यात झाली. त्याखालोखाल घनसावंगी येथे १३.४ मि.मी., परतूरमध्ये १२.९ मि.मी., अंबडमध्ये ९.९ मि.मी. आणि जालना तालुक्यात ६.२ मि.मी. पाऊस झाला. भोकरदन, जाफराबाद आणि मंठा तालुक्यात मात्र पावसाची नोंद झाली नाही. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसतांनाच कडक उन्हामुळे खरीप पिके ताणावर आली होती.

हलक्या जमिनीत पिके माना टाकतांना दिसुन येत असल्याने शेतकरी धास्ताववले होते. मात्र बुधवारी पडलेल्या रिमझिम पावसाने खरीप पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका आदी खरीप पिकांची वाढ सुरू आहे. गेल्या काही दिवसांच्या उघडीपामुळे पिकांवर ताण येऊ लागला होता. अशा परिस्थितीत झालेल्या रिमझिम पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला असून पिकांना जीवनदान मिळाले आहे.

शेलगावात अतिवृष्टी

शेलगाव मंडळात अतिवृष्टी बदनापूर तालुक्यातील शेलगाव मंडळात ८९.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पावसाळ्यात शेलगाव मंडळात चांगला पाऊस पडल्याची नोंद आहे. शेलगाव मंडळात काही ठिकाणी पाणी वाहतांना दिसुन आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT