

No rain again in any taluka till July 12; Stress on kharif crops, farmers are worried
परभणी, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मान्सूनचे 1 आगमन होऊनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जूनपासून सुरू झालेल्या पावसाने सुरुवातीला काही प्रमाणात दिलासा दिला असला, तरी त्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडण्याची भीती निर्माण झाली. महसूल विभागाच्या १२ जुलै रोजी सकाळी १०.२१ वाजेपर्यंतच्या पर्जन्यमान अहवालानुसार, जिल्ह्यात जूनपासून आतापर्यंत सरासरी १३३.३ मिमी, म्हणजेच ५७.९ टक्के पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जिल्ह्यातील एकाही तालुक्यात नव्या पावसाची नोंद झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
जुलै महिना हा खरीप पिकांच्या वाढीसाठी अत्यंत ह महत्त्वाचा मानला जातो. मात्र, पावसाच्या दीर्घ खंडामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद तसेच इतर पिकांच्या उगवणीवर व वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची व शक्यता आहे. अनेक ठिकाणी पेरणीनंतर जमीन कोरडी पडत असून दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. विहिरी, शेततळी आणि लहान जलसाठ्यांमध्येही अपेक्षित पाणी साचले नसल्याने आगामी काळातील सिंचनाचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे.
तालुकानिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास पूर्णा तालुक्यात सर्वाधिक १४३.३ मिमी (७० टक्के) पर्जन्यमानाची नोंद झाली असून तो जिल्ह्यात आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पाथरी (१४९.७ मिमी-६९.२ टक्के), मानवत (१४३.९ मिमी - ६७.७ टक्के), जिंतूर (१५२.० मिमी ६७ टक्के) आणि गंगाखेड (१३२.२ मिमी ६५.६ टक्के) या तालुक्यांचा क्रमांक लागतो.
दुसरीकडे पालममध्ये केवळ १११.१ मिमी (४९.१ टक्के), सोनपेठमध्ये ९०.५ मिमी (४५ टक्के), परभणी तालुक्यात १३५.४ मिमी (५४.८ टक्के) आणि सेलूमध्ये १२४.८ मिमी (५६.२ टक्के) पर्जन्यमानाची नोंद झाल्याने या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. जून ते सप्टेंबर या संपूर्ण हंगामासाठी जिल्ह्याचे सरासरी सामान्य पर्जन्यमान ७६१.३ मिमी असून त्यापैकी आतापर्यंत अवघे १७.५ टक्के पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातही सरासरी ७९.४ टक्के पर्जन्यमानाची नोंद झाली असली, तरी परभणी जिल्हा विभागीय सरासरीच्या तुलनेत मागे असल्याचे स्पष्ट होत आहे.
हवामान खात्याच्या पुढील अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून, पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी करण्याचे, आवश्यकतेनुसार आंतरमशागत करण्याचे आणि हवामानाच्या अंदाजानुसार कृषी नियोजन करण्याचे आवाहन केले. सध्या जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची नजर आभाळाकडे लागून राहिली असून, दमदार पावसाची प्रतीक्षा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.