परतूर : जालना आणि संपूर्ण मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला गती देण्यासाठी तसेच प्रलंबित मागण्या शासन दरबारी लावून धरण्यासाठी गेल्या २५ वर्षांपूर्वी जालन्यात 'जिल्हा रेल्वे संघर्ष समिती'ची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेपासूनच दिवंगत गणेशलाल चौधरी यांच्या खंबीर आणि निर्विवाद नेतृत्वाखाली या समितीने रेल्वेच्या अनेक प्रश्नांवर यशस्वी लढे दिले.
मात्र, चौधरी यांच्या निधनानंतर आता या समितीत अंतर्गत धुसफूस आणि 'खदखद' उफाळून आली आहे. निमित्त ठरले आहे ते आगामी ३० ऑगस्ट रोजी जालन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य 'रेल्वे परिषदे'चे! या परिषदेच्या आर्थिक नियोजनावरून समितीमध्ये मोठा पेच निर्माण झाला असून, २५ वर्षांची एकजूट आता आर्थिक गणितांमुळे धोक्यात आल्याचे चित्र आहे. जालना हे स्टील आणि सीड हब म्हणून ओळखले जाते.
रेल्वे संघर्ष समितीतही जालन्यातील अनेक बड्या आणि नामांकित उद्योजकांचा थेट समावेश आहे. असे असतानाही, या महत्त्वपूर्ण परिषदेसाठी आवश्यक असलेला निधी देण्यास हे उद्योजक तयार होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. उद्योजकांनी आर्थिक पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्यामुळे संघर्ष समितीपुढे आतापर्यंतचा सर्वात मोठा पेच उभा ठाकला आहे.
दिग्गजांची उपस्थिती, पण खर्चाचा पेच
या नियोजित रेल्वे परिषदेला माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि खासदार संदीपान भुमरे यांच्यासह अनेक वरिष्ठ लोकप्रतिनिधी व रेल्वेचे अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. एवढ्या मोठ्या स्तरावरील परिषदेच्या आयोजनासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची आवश्यकता आहे. मात्र, हा वित्तपुरवठा नेमका कुठून आणि कसा करायचा, यावरून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले आहेत..
विभागीय कार्यालयासाठी जालन्याचा दावा मजबूत
नांदेड रेल्वे विभागाव्यतिरिक्त मराठवाड्यासाठी जालना किंवा छत्रपती संभाजीनगर येथे आणखी एक नवीन विभागीय कार्यालय उभारण्यात यावे, ही या भागातील जुनी आणि हक्काची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरच्या तुलनेत जालन्यात रेल्वे विभागासाठी पुरेशी आणि हक्काची शासकीय जागा उपलब्ध असल्यामुळे, हे कार्यालय जालन्यातच व्हावे यासाठी संघर्ष समितीकडून विशेष जोर दिला जात आहे. याच पार्श्वभूमीवर ३० ऑगस्ट रोजी जालन्यात एका मोठ्या रेल्वे परिषदेचे आयोजन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.