Jalna Crime : सुंदरनगरातून २२ तलवारी, १५ खंजीर व ४ चॉपरसह ४१ घातक हत्यारे जप्त!

शहरातील सराईत गुंड अटकेत; १ लाख ३४ हजारांचा शस्त्रांचा साठा उद्ध्वस्त
Jalna weapon seizure
जालनाः चंदनझिरा पोलिसांनी जप्त केलेली घातक शस्त्र. यावेळी उपस्थित उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी, चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण बिडवे आदी. (छायाः शरद खानापुरे)
Published on
Updated on

जालना: जालना शहरात भीषण गुन्हेगारी आणि दहशत पसरवण्याच्या उद्देशाने साठवून ठेवलेला घातक शस्त्रांचा मोठा साठा चंदनझिरा पोलिसांनी उद्ध्वस्त केला आहे. सुंदरनगर परिसरात मारलेल्या छाप्यात २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा एकूण १ लाख ३४ हजार रुपये किमतीचा तब्बल ४१ शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू यांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कडक कारवाईचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने चंदनझिरा पोलिस ठाण्याचे नूतन पोलिस निरीक्षक किरण बिडवे व त्यांचे पथक रेकॉर्डवरील संशयितांवर विशेष नजर ठेवून होते.

Jalna weapon seizure
Chhatrapati Sambhajinagar News | 'त्या' बैठकीशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा संबंध नाही : डॉ. तायडे

दरम्यान, सुंदरनगर परिसरातील राबिया मशिदीच्या मागे राहणारा सराईत गुन्हेगार शेख माजेद शेख लतिफ (वय २३) हा संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खबाऱ्यांमार्फत सखोल चौकशी केली असता, माजेदने त्याच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणावर धारदार शस्त्रे दडवून ठेवली असून, ती शहरातील गुन्हेगारांना विकण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याच्या बेतात असल्याची पक्की माहिती मिळाली.

उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. किरण बिडवे व पथकाने सुंदरनगर येथील शेख माजेदच्या घरावर अचानक छापा टाकला. घराची झडती घेतली असता पोलिसांनाही धक्का बसला. त्याच्या घरातून तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर अशी एकूण ४१ घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. या गंभीर गुन्ह्यात त्याचा साथीदार इम्रान ऊर्फ इम्मा सलीम शेख (रा. इंदिरा नगर, जालना) हादेखील सहभागी असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपीला १२ पर्यंत पोलिस कोठडी

अटक करण्यात आलेला आरोपी शेख माजेद आणि त्याचा फरार साथीदार इम्राण उर्फ इम्मा हे दोघेही पोलिसांच्या दफ्तरी नोंद असलेले सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. कोर्टाने आरोपी शेख माजेद याला १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. ही शस्त्रे त्यांनी कुठून आणली आणि कोणाला विकणार होते, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

Jalna weapon seizure
Chhatrapati Sambhajinagar road accident : अंधारात वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने कारचा अपघात

कारवाई करणारे पोलिस पथक

ही कारवाई पोलिस अधीक्षक तेगबीरसिंह संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण बिडवे, पोउपनि रवी देशमाने, सफौ राजेंद्र ठाकूर, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजीत वायकोस, शरद पवार, मदन बहुरे, विजय बहुरे, राजेंद्र पवार, पोकॉ सुनील पगार, सागर खैरे, नवनाथ पाटील व महिला पोलिस मधू जयाती यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news