दीपक रणनवरे आणि मनोज जरांगे pudhari photo
जालना

Jalna protests : जालना जिल्हा पुन्हा बनला आंदोलनाचे केंद्र

उपोषण अन्‌ आंदोलनाने वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

जालना : सुहास कुलकर्णी

जालना शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या उपोषण व आंदोलनामुळे जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. मराठा,ब्राम्हणांसह इतर समाजाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपोषण व आंदोलनामुळे जालना जिल्हा आंदोलनाचे केंद्र बनले आहे.

अंबड तालुक्यातील अंंतरवाली सराटी येथे शनिवारपासून मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. यामुळे अंतरवाली सराटी येथे संपूर्ण राज्यातुन येणाऱ्या मराठा समाज बांधवांची गर्दी वाढली आहे. हजारोच्या संख्येने समाज बांधव जरांगे यांच्या आंदोलनस्थळी येत असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत.

रविवारी त्यांनी परभणीचे खा.संजय उर्फ बंडू जाधव यांना भ्रमणध्वनीवर करुन याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र त्यानंतरही परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा झाला.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची परतफेड मुंबईत जावुन करणार असल्याचा इशारा दिल्याने आगामी काळात मुंबईतील जरांगे यांच्या आंदोलनाकडे सर्वाचे लक्ष लागणार आहे.

दुसरीकडे जालना शहरातील गांधी चमन येथे ब्राम्हण समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिपक रणनवरे यांनी शनिवारपासून उपोषणास सुरुवात केली आहे. रविवारी त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस होता. मराठवाड्यातील विविध ठिकाणाहून ब्राम्हण समाज बांधव जालना येथे येउन दिपक रणनवरे यांच्या उपोषणाला पाठींबा देत आहेत.दिपक रणनवरे यांच्या आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी गावपातळीवर उपोषण करावे असे अवाहनही काही समाजबांधवांनी केले आहे.

अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण ‘अ, ब, क, ड’ या पद्धतीने करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी समस्त मातंग समाजाच्या अनेक ठिकाणी आंदोलने झाली. जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या उपोषण व आंदोलनामुळे पोलिस प्रशासनावरील ताण वाढला आहे.आगामी काही दिवस पोलिस यंत्रणेसाठी कसौटीचे ठरणार आहेत.जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबधित ठेवतांना पोलिस यंत्रणेला कसरत करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT