Paradh Police Case Filed Against 40
भोकरदन : शेतमोजणीसाठी दिलेल्या पोलीस बंदोबस्तादरम्यान सरकारी कामात अडथळा आणत त्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की केल्याचा प्रकार मेहगाव शिवारात घडला. यावेळी संबंधितांनी धावडा-गोद्री रस्ता रोखून वाहतूकही बंद पाडली. या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात ४० नामनिर्देशित व्यक्तींसह अन्य २० ते ३० महिला-पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि. ७ ) सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान धावडा-गोद्री रस्त्यावरील टेंभरे यांच्या शेतकरी ढाब्यासमोर हा प्रकार घडला. पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांच्या आदेशानुसार मेहगाव शिवारातील शेत गट क्रमांक १९ ची मोजणी करण्यासाठी पोलीस संरक्षण देण्यात आले होते.
पोलीस अंमलदार संतोष गुलाबराव जाधव (वय ३२, नेमणूक पारध पोलीस ठाणे) हे सहकाऱ्यांसह बंदोबस्तासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र, ते शेतात जात असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव करून त्यांना रोखले. यावेळी पोलिसांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप आहे.
यानंतर जमावाने धावडा-गोद्री रस्त्यावर बसून वाहतूक अडवली. शेताची मोजणी करू न देण्याचा इशारा देत, मोजणीचा प्रयत्न केल्यास स्वतःच्या जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी पोलिसांना देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष जाधव यांच्या फिर्यादीवरून रमेश शामराव गवळी, श्याम जगन्नाथ माकोडे, समाधान गवळी, अंबादास गवळी यांच्यासह धावडा, मेहगाव आणि वडाळी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील एकूण ४० नामनिर्देशित व्यक्ती तसेच अन्य २० ते ३० अनोळखी महिला व पुरुषांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एन. जायभाये या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.