Jalna News: The inauguration of the Ashti bus stand is facing delays; passengers are suffering immensely
राजू म्हस्के
कडा : आष्टी येथे बसस्थानकाची अद्ययावत इमारत बांधण्यात आली आहे. मात्र या इमारतीचे अद्यापही उद्घाटन झाले नाही. मागील काही दिवसांपासून ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. लाखो रुपये खर्चुन बांधण्यात आलेली इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याने प्रवाशांना जुन्या पडक्या, अत्यंत घाणीचे साम्राज्य असलेल्या बसस्थानकाचा आसरा घ्यावा लागतो. ऊन वारा, थंडीचा सामना करत प्रवास करावा लागतोय, त्यातच पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते. त्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांची मोठी अडचण होत आहे.
दरम्यान या इमारतीचे तातडीने उद्घाटन करण्याची मागणी करण्यात येत असून नवीन बसस्थानक हे सुसज्ज असे बसस्थानक साकारण्यात आले आहे. तब्बल १० बससाठी फलाट, एसटी चालक-वाहकांसाठी विश्रांती कक्ष, व्यवसायिक गाळे, उपहार गृह अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्थाही या ठिकाणी तयार करण्यात आली परंतु सध्या मात्र या बस स्थानकाच्या सुरक्षितेसाठी सुरक्षा भिंत नसल्याने किंवा सुरक्षा रक्षक नसल्याने महिलांची सुरक्षा संदर्भात कुठल्याही उपयोजना करण्यात आल्या नसल्याने या ठिकाणी छेडछाड किंवा चोऱ्या होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
रात्री अपरात्री येणाऱ्या प्रवाशांना भूक किंवा तहान लागल्यावर नाश्ता तसेच पिण्यासाठी पाणी याठिकाणी उपलब्ध नसून त्यासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे अशा प्रवाशांची सोय परिवहन विभागाने करावी अशी मागणी होत असून यातच प्रवाशांना सोडण्यासाठी आलेल्याना त्यांची गाडी पार्क करण्यासाठी याठिकाणी कुठेही जागा नाही त्याची देखील मोठी गैरसोय सध्या होत आहे. एवढेच नाही तर परिवहन विभागाच्या अजब कारभार पहावयास मिळत असून बस स्थानकात प्रवाशांना पिण्यासाठी बोअरच्या पाण्याने चक्क बॅरल भरून ठेवले आहे.
लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या बसस्थानकात शुध्द आणि थंड पाण्याचीही सोय करण्यात आलेली नाही. टाक्यांमध्ये जमा केलेले पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. वृद्ध महिला, गर्भवती महिला तसेच लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांना स्वच्छता गृह नसल्याने मोठी गैरसोयीचा सर्वाधिक फटका बसत आहे. सुरक्षित आणि स्वच्छ स्वच्छतागृहामुळे महिलांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या आधुनिक बसस्थानकात ही मूलभूत सुविधा उपलब्ध न होणे ही गंभीर बाब आहे. नवीन बसस्थानकात १० बससाठी प्लॅटफॉर्म, चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहे, व्यापारी गाळे, कॅन्टीन, हिरकणी कक्ष आणि आधुनिक सुरक्षा यंत्रणा तयार आहे. तरीही केवळ उद्घाटनाचा मुहूर्त न मिळाल्याने ही इमारत धूळ खात पडून आहे.
मग कुठपर्यंत आमचा अंत पहायचा? असा सवाल नागरिक आता उपस्थित करत आहेत. या संदर्भात विचारणा करण्यासाठी आष्टी आगार प्रमुख चोथमल यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की तुम्ही रात्री का फोन केला ? असे सांगून फोन कट केला.
हिरकणी कक्ष कुलूपबंद; स्तनदा मातांची गैरसोय
प्रवास करणाऱ्या स्तनदा मातांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या स्थानकात हिरकणी कक्ष तयार करण्यात आले आहे. मात्र या खोलीलाही कुलूप असल्याने लहान बाळांना स्तनपान करताना सार्वजनिक ठिकाणी स्तनदा महिलाची मोठी गैरसोय होत आहे. ही बाब येथील व्यवस्थापनाकडे अनेकदा मांडण्यात आली. मात्र त्यांच्याकडून आम्ही काय करणार? हा आमचा विषय नाही हा वरच्या लेव्हलचा विषय आहे असे उद्धट उत्तरे ऐकायला मिळतात. तरी संबंधितांना तत्काळ कुलुपबंद हिरकणी कक्ष खुला करुन देण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली
लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची गरज
आष्टी बसस्थानकासारख्या अत्यावश्यक सार्वजनिक सुविधेबाबत सुरू असलेली दिरंगाई ही गंभीर बाब ठरत आहे. लाखो रुपये खर्चुन उभारलेले सुसज्ज बसस्थानक उद्घाटनाअभावी बंद ठेवले गेले असून त्याचा थेट फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांचे हाल सुरू असताना लोकप्रतिनिधी गप्प का ? असा प्रश्न प्रवाशी विचारत आहेत..