

At the Andhera police station, the Superintendent of Police provided guidance to the village police officers
देऊळगाव राजा, पुढारी वृत्तसेवा :
तालुक्यातील अंढेरा पोलिस ठाण्यात वार्षिक निरीक्षण निमित्ताने पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या उपस्थितीत पोलिस पाटील दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच अंढेरा पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलिस पाटील, नागरिक व उपस्थितांना कायदा-सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध आणि पोलीस सहकार्याबाबत पोलिस अधिक्षकांनी मार्गदर्शन केले.
अंढेरा पोलिस ठाण्यातंर्गत मागील काही दिवसापासुन कायदा व सुव्यस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. २०२५ या वर्षात ५० हून अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडले आहेत. त्यामध्ये खून, बलात्कार, घरफोड्या, मारहाण, विनयभंग, चोरी, आत्महत्या व अवैध कृत्यांचा समावेश आहे. २०२६ ची सुरुवातही गुन्ह्यानेच झाली आहे.
अंढेरा परिसरात शेतकऱ्यांच्या शेतातून विद्युत मोटर, पाईप, तार शेती साहित्य चोरीला जाण्यासह तुरीच्या सुड्या जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. वारंवार तक्रारी करूनही रात्रीची गस्त प्रभावी नसल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांना करण्यात येणारे मार्गदर्शन कितपत प्रभावी ठरणार हे समजू शकले नाही. पोलिस ठाण्यांतर्गत असलेल्या ४५ गावांच्या परिसरात राष्ट्रीय महामार्ग व जंगलपट्टा असूनही तेथे नियमित नाकाबंदी, गस्त व विशेष मोहिमा प्रभावीपणे राबवल्या जात नसल्याचे चित्र आहे.
परिणामी गुन्हेगार निर्धास्त असल्याची भावना बळावत आहे. पोलिस ठाण्यातंर्गत असलेल्या अकार्यक्षमतेबाबत जबाबदारी निश्चित होणार का? हा प्रश्न अनुत्तरित आहे.