

Jalna News: Attention is focused on the stance of the BJP leaders
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील भाजपा नेत्यांच्या भूमिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिका निवडणुकीमुळे विश्वास वाढलेले भाजप नेते आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत स्वबळाचा नारा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जालना जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून विविध निवडणुका भाजपा शिवसेना युतीने खांद्याला खांदा लावून लढविल्या आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जिल्ह्यातील शिवसेनेकडे मोठ्या भावाची तर भाजपाकडे लहान्या भावाची भूमिका होती. मात्र शिवसेना व राकाँ पक्षामध्ये फूट पडल्यानंतर भाजपाच्या राजकीय घौडदौडीला चांगलाच वेग आला आहे.
काँग्रेसही जिल्ह्यात म्हणावी तशी पावरफुल राहिली नसल्याने जिल्ह्यातील राजकारणात नगरपालिका व महापालिका निवडणूक स्वबळावर लढवित भाजपाने राजकीय ताकद वाढवली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे व राकाँ अजित पवार पक्षाला सोबत घेण्याची शक्यता कमीच दिसत असल्याचे चित्र आहे. नगरपालिका, महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतून भाजपा २०२९ च्या निवडणुकीची तयारी करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाची ताकद वाढल्याने भाजपा आता मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे. यावेळी इतरांना सोबत न घेता पक्षाचा विस्तार करण्याचे तत्त्व नेत्यांनी अंगीकारल्याचे दिसत आहे.
इच्छुकांची गर्दी!
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारीकरिता सर्वाधिक इच्छुकांची संख्या भाजपाकडेच राहणार असल्याचे चित्र आहे. मागील काही निवडणुकीत भाजपाची उमेदवारी म्हणजे विजयाची शक्यता हे ओळखून भाजपाकडे बाहेरून येणाऱ्यांची गर्दी वाढणार असल्याचे दिसत आहे. यामुळे निष्ठावंत उपेक्षित राहण्याची शक्यता आहे.