Jalna News: Mahashivratri is celebrated with enthusiasm throughout the city and district
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह जिल्ह्यात महाशिवरात्रीचा उत्सव यंदा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख महादेव मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. 'हर हर महादेव'च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
शहरातील जुना जालना भागातील अमृतेश्वर, श्री सिद्धेश्वर, नवीन जालन्यातील पंचमुखी महादेव मंदीर, कंकणेश्वर महादेव मंदीर, भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील पुरातन शिवमंदीर, कोदा येथील कोद `श्वर महादेव मंदीर, जालना तालुक्यातील नेर येथील महादेव मंदीरासह अंबड, मंठा, बदनापुर घनसावंगी येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमीत्त रविवारी पहाटे पासून अभिषेक, रुद्रपाठ आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी रांगेत उभे राहून शिवलिंगावर बेलपत्र, दूध व फुलांचा अभिषेक केला. काही ठिकाणी स्वयंसेवी संस्थांकडून पिण्याच्या पाण्याची व प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठाही फुलल्या होत्या. मंदिर परिसरात बेलपत्र, फुले, हार, अगरबत्ती, नारळ आणि प्रसादाच्या स्टॉल्सवर दिवसभर खरेदीसाठी गर्दी दिसून आली. उपवास करणाऱ्या भाविकांसाठी साबुदाणा, शेंगदाणा, राजगिरा लाडू, फराळाचे पदार्थ यांचीही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले मागील वर्षांच्या तुलनेत यंदा फराळ सामानाच्या विक्रीत वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही ठिकाणी वाहतूक वळविण्यात आली होती. मंदिर परिसरात सीसीटीव्ही आणि स्वयंसेवकांच्या मदतीने व्यवस्था सुरळीत ठेवण्यात आली.
वातावरण झाले भक्तिमय
उपवास, पूजा-अर्चा आणि रात्रीच्या जागरणामुळे शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात महाशिवरात्री उत्साहात आणि शांततेत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.