

The Shiv Smarak Yatra has begun
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीन छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून (दि.१४) शिवस्मारक यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. या यात्रेचा समारोप मंगळवारी (दि.१७) रोजी करण्यात येणार आहे.
शिवस्मारक यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्या ठिकाणी रथा मध्ये असलेल्या सर्व महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे; श्रीराम, विठ्ठल रुक्माई व महादेवाला हार पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले. त्या नंतर या शिवस्मारक रथ यात्रेला सुरुवात झाली आहे.
या शिव स्मारक रथ यात्रेत ५१ सजविलेल्या वाहनांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे व सर्वात समोर एकाच रथात सर्व महापुरुषांचे अर्धाकृती पुतळे; श्रीराम, विठ्ठल रुक्माई व महादेवाची मूर्ती व गाय वासरू आहे. या शिवस्मारक यात्रेचा समारोप माजलगाव येथे मंगळवारी (ता. १७) होणार आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. सामाजिक बांधिलकीची जपवणूक करावी, प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कर्तृत्व स्वतःच्या आचरणात आणावे, हा या शिवस्मारक यात्रेमागील उद्देश आहे असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी सांगितले आहे. ठिक-ठिकाणी स्वागत करण्यात आले. या शिवस्मारक यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात शिवभक्त सहभागी झाले आहे.
गोंदी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
या शिवस्मारक रथयात्रे साठी गोंदी पोलिसाकडून अधिकारी व कर्मचारी १०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेण्यात आली आहे.
शिवस्मारक यात्रेचे असे मार्गक्रमण
१६ फेब्रुवारीला अहमदपूर, लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, औसा, तुळजापूर, धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, तेर, ढोकी मार्गे कळंब येथे मुक्काम होणार आहे. १७ फेब्रुवारीला कळंब, केज, अंबाजोगाई येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, परळी मार्गे, माजलगाव येथे समारोप होणार आहे.