Jalna News: Court Orders Judicial Custody for Corrupt Officials Until June 12
जालना, पुढारी वृत्तसेवा : मामा चौक ते कोलू तेल घाणा परिसरातील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कामासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी जालना महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
दरम्यान, सदरबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींमध्ये महानगर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक तथा सहायक अतिक्रमण पथकप्रमुख सॅमसन छबुराव कसबे (५२), प्रभारी सहायक अतिक्रमण पथकप्रमुख भाऊलाला चापा राठोड (५७), यांचा समावेश आहे.
मामा चौक ते कोलू तेल घाणा परिसरातील नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेसंदर्भात आरोपींनी तक्रारदाराकडे ४० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पडताळ-णीनंतर पंचासमक्ष लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
२९ मे रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी (दि. १ जून) त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सुरू आहे.