

जालना : जुना जालना येथील भाजीमंडी परिसरात मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान महानगरपालिकेच्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, घटनेप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव सदर मोहीम स्थगित करण्यात आली.
जालना शहर महानगरपालिकेच्या आयुक्त अंजली शर्मा यांच्या आदेशान्वये तसेच सहायक आयुक्त विजय फुलंब्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजीमंडी, जुना जालना परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यासाठी पथक गेले होते. या पथकात अतिक्रमण पथकप्रमुख बी. सी. राठोड, सहाय्यक शामसन कसबे, लिपिक अजय पेम्बर्ती, उत्तम लाडाने यांच्यासह 20 ते 25 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
मोहीम सुरू असताना काही नागरिकांनी विरोध करत पथकास अडविल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जमावाने अचानक गोंधळ घालत पथकावर हल्ला केल्याने परिसरात धावपळ उडाली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने मनपाच्या कर्मचाऱ्यांना मोहीम अर्धवट सोडून माघार घ्यावी लागली.
या प्रकरणी अदनान चाऊस, रा. लतिफ शहा बाजार, जुना जालना यांच्याविरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, मनपा प्रशासनाने बुधवारी (दि. 20) मामा चौक ते टांगा स्टॅण्ड परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. संबंधित दुकानदार व नागरिकांनी स्वखुशीने अतिक्रमण काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.