Jalna News: Cooler Sales and Repairs Surge as Temperatures Rise
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून नागरिकांना उन्हाच्या झळा असह्य होत असल्याचे चित्र आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांच्या जिवाची लाही लाही होत असून उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक घरातील जुने कूलर बाहेर काढून त्याची दुरुस्ती करताना दिसत आहेत. वाढत्या तापमानामुळे शहरासह ग्रामीण भागात कूलर वापराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. नवीन कूलरच्या विक्रीतही चांगली वाढ होतांना दिसत आहे.
तालुक्यात उन्हाचा पारा वाढताच अनेक नागरिकांनी घरातील कानाकोपऱ्यात पडलेले जुने कूलर बाहेर काढून त्यांची दुरुस्ती करण्यास सुरुवात केली आहे. कूलरमध्ये नवीन गवत बसवणे, मोटर दरुस्ती, पाण्याची व्यवस्था आदी कामांसाठी शहरातील कूलर दुरुस्ती दुकानावर नागरिकांची गर्दी वाढत आहे. परिणामी कूलर विक्रीसोबतच दुरुस्तीच्या कामालाही चांगलाच वेग आला आहे.
बाजारात नवीन कुलर तसेच ए.सी.च्या मागणीत वाढ झाली आहे. शहरातील दुकानदारांनी सांगितले की, यंदा मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि लोखंडी बॉडी असलेल्या तीन फूट आकाराच्या कूलरला सर्वाधिक मागणी होत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही लोखंडी कूलरला पसंती दिली जात आहे. दरम्यान, वाढत्या मागणीमुळे यंदा कूलरच्या किमतीतही वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कूलरचे दर काही प्रमाणात वाढले असले तरी यंदा कूलर विक्री चांगली होणार असल्याचे दिसत आहे.
लाईट वेट कूलरला मागणी
हलके व आकर्षक अशा फायबरचे कूलर घेण्याकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. कमी पाण्यात अधिक वेळ परिसर थंड ठेवण्याची क्षमता या कूलरमध्ये असते. यामुळे त्यांना पसंती मिळत आहे. अनेकांच्या घरी बाहेरून कूलर लावायला जागा नसते. अशा वेळी असे कूलर घरात लावता येत असल्याने सोयीस्कर ठरतात. ते एका जागेवरू न दुसरीकडे सहज हलविता येतात. सोयीच्या दृष्टीने असे कूलर घेतले जात आहेत.
अनेकांना मिळतोय रोजगार कूलर दुरुस्तीतून अनेक कारागिरांना चांगला रोजगार मिळत आहे. वाळे व मोटर बदलणे, खराब झालेली वार्यारंग नवीन टाकणे यासह इतर कामे करण्यात येत आहेत.- दत्ता पवार, कूलर मेकॅनिक