Jalna News : एकनाथ शिंदे, चाकणकर यांच्याशी संबंधित बाबा म्हणूनच अशोक खरातवर कारवाई : प्रा. श्याम मानव file photo
जालना

Jalna News : एकनाथ शिंदे, चाकणकर यांच्याशी संबंधित बाबा म्हणूनच अशोक खरातवर कारवाई : प्रा. श्याम मानव

प्रा. श्याम मानव यांचे जालन्यातील व्याख्यानात प्रतिपादन

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Action Taken Against Ashok Kharat Eknath Shinde Chakankar Prof. Shyam Manav

जालना, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी संबंधित बाबा म्हणून अशोक खरातवर तातडीने कारवाई करण्यात आली, मात्र खरात प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ आमदार आणि मंत्र्यांचा सहभाग असता तर खरातवर कारवाई झाली असती का? असा सवाल अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संस्थापक प्रा. श्याम मानव यांनी येथे उपस्थित केला.

जालना शहरातील मातोश्री लॉन्सवर शनिवारी (दि. २३) बुवा तेथे बाया या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जालना व समविचारी सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे अध्यक्षस्थानी होते. उद्योजक तथा सामाजिक नेते नारायण चाळगे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विचारमंचावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमूरे, राष्ट्रीय सचिव प्रशांत सपाटे, दत्ताभाऊ शिरसाट, संतोष गाजरे, विभावरी ताकट, तुळशीराम शेळके, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जालना जिल्हाध्यक्ष मोहन राठोड, कार्याध्यक्ष काकासाहेब खरात, जिल्हा संघटक सुनील वाघ आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रा. मानव पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये राज्यात जादूटोणा विरोधी कायदा मंजूर झाला,

पण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यामुळे अशोक खरात सारखे बाबा महाराष्ट्रात निर्माण होत आहेत. धीरेंद्र शास्त्री समाजामध्ये अनेक अवैज्ञानिक दावे करीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकाळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम वेगाने सुरू होते. मात्र, अलीकडे हे काम निधीअभावी मागे पडले. प्रबोधन कार्यक्रमांच्या माध्यमातून निधी संकलन करून आम्ही ते काम पुढे नेत आहोत, असेही मानव यांनी सांगितले.

राज्यात जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तरच वाढत्या बुवाबाजीला आळा बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना नारायण चाळगे यांनी बुवाबाजीला आळा घालण्यासाठी सरकारने कडक पाऊले उचलावीत असे सांगीतले.

अध्यक्षीय समारोप करताना राजाभाऊ देशमुख म्हणाले की, अलिकडे राजकीय पक्षानी प्रवचनकारांना पक्षीय प्रचारक करून टाकले आहे, खरे सामाजिक प्रबोधनकार बोटावर मोजण्याएवढेच शिल्लक असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी समाजात जागृती निर्माण करण्याची गरजही देशमुख यांनी प्रतिपादित केली. यावेळी अंकुशराव देशमुख, प्रा. बसवराज कोरे, डॉ. नारायण बोराडे, कॉ. अण्णा सावंत, डॉ. रावसाहेब ढवळे, प्रा. सुभाष देठे, गोविंदप्रसाद मुंदडा हे उपस्थित होते.

बाबा दोन वेळेस पळाला

धीरेंद्र कृष्ण महाराज ऊर्फ बागेश्वर बाबा हासुद्धा दिव्य दरबार भरवून लोकांचे आजार ओळखतो आणि आजार बरे करण्याचा दावा करतो. मात्र, अंधश्रद्धा निर्मलून समितीने दिलेले ३० लाख रुपयांच्या बक्षिसाचे आव्हान त्याने स्वीकारले नाही, दोन वेळेस नागपूरमधून तो पळाला, असे प्रा. श्याम मानव यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT