Ashok Kharat | ऐसे कैसे झाले भोंदू...

Ashok Kharat |
Ashok Kharat | ऐसे कैसे झाले भोंदू...(Pudhari File Photo)
Published on
Updated on

मानवजात जन्माला आल्यापासून धर्म हा कायम या ना त्या स्वरूपात त्याच्या बरोबर आहे. धर्म अथवा धर्मग्रंथांतून जीवनाबद्दल मार्गदर्शन केले जाते; मात्र एखादी गोष्ट धर्मग्रंथांत सांगितली आहे, फार मोठा शास्त्री, पंडित ती सांगतो आहे; मात्र ती तुमच्या विचारशक्तीला पटत नसेल, तर ठामपणे ती नाकारा, अशी स्पष्टोक्ती स्वामी विवेकानंद यांनी केली होती. विचारशक्ती ही परमेश्वराने माणसाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. तिचा वापर करून तुम्ही काही नाकारलेत, तर परमेश्वराला आनंदच होईल; मात्र विचार न करता तुम्ही ती गोष्ट स्वीकारलीत, तर तुम्ही पशूच्या पातळीला पोहोचलात म्हणून परमेश्वराला वाईटच वाटेल, असेही विवेकानंद म्हणाले होते; पण थोर व्यक्तींनी सांगितलेले विचार समाज आत्मसात करत नाही. म्हणूनच भोंदूबाबांचे फावत असते. भोंदूगिरी करणारा नाशिकचा स्वयंघोषित कॅप्टन ज्योतिषी अशोक खरात याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता आणि अनेक महिलांचे शोषण केले होते, असा त्याच्यावर आरोप आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करून, मंत्रतंत्राच्या नावाखाली संमोहन करत, पीडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.

एका पेन ड्राईव्हमध्ये असलेले खरात याच्या संदर्भातील 58 व्हिडीओ पोलिसांनी जप्त केले आहेत. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍या खरातकडे राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी येणार्‍यांमध्ये महाराष्ट्रातील बडे नेते, मंत्री यांच्याप्रमाणेच इतर राज्यांतील उच्चपदस्थांचाही समावेश होता. तोंडाने रोजच्या रोज शाहू-फुले-आंबेडकरांचा जयघोष करणार्‍या नेत्यांचे प्रत्यक्षातील वर्तन हे वेगळे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. लोकांना मार्गदर्शन करणारे हे नेते स्वतःची विचारशक्ती खुंटीला बांधून खरातसारख्या बाबाच्या नादी लागतात, हे संतापजनक आहे. खरात याने सिन्नर तालुक्यातील मिरगाव शिवारात उभारलेल्या ईशान्येश्वर मंदिरासह स्थापन केलेला शिवनिका संस्थान ट्रस्टही चर्चेत आला आहे. या मंदिराला अनेक नेत्यांनी भेटी देतानाच ट्रस्टवर बड्या मातब्बरांची वर्णीही लावण्यात आली आहे. ट्रस्टवर मोठमोठे नेते असल्यामुळे खरात अधिक चर्चेत आला. ईशान्येश्वर मंदिराची उभारणी केल्यानंतर शिर्डीला येणारे भाविक सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या कडेला मिरगाव शिवारात असलेल्या मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले. या संस्थानावर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर या विश्वस्त आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र, श्रावणात होणारे उत्सव व गुरुपौर्णिमेला श्रीमती चाकणकर या उपस्थित असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.

आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार श्रीमती चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांची विविध छायाचित्रे आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महायुती सरकारची पुरती नाचक्की झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांना हे कठोर पाऊल उचलावे लागले. खरातची पाद्यपूजा करतानाची, त्याच्या डोक्यावर छत्री धरतानाची त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. धक्कादायक बाब म्हणजे श्रीमती चाकणकर या तंत्रमंत्र करत असून, त्यांनी या ढोंगी बाबाच्या सांगण्यावरून आपली अनामिका कापून घेतल्याचा आरोप शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. श्रीमती चाकणकर यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असले, तरीदेखील राजीनामा देताना त्यांनी जो युक्तिवाद केलेला आहे, तो अजिबात पटणारा नाही. आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर ती व्यक्ती नंतरच्या काळात काय करेल याची आपल्याला कल्पना नसते, अशी सारवासारव श्रीमती चाकणकर यांनी केली आहे; मात्र या खरातची बदमाषी अनेक दिवसांपासून सुरू असून, त्याच्या जाळ्यात बर्‍याच महिला फसलेल्या होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षांना याची कल्पनाच नव्हती, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. मुळात त्यांनी स्वतःच राजीनामा द्यायला हवा होता; परंतु तो न दिल्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांची हकालपट्टी करावी लागली. आपल्या अडचणी निवारण्यासाठी किमती खड्यांची विक्री, धार्मिक विधी, कर्मकांडे ही या खरातची कार्यप्रणाली राहिली आहे.

महाराष्ट्रात जादूटोणा प्रतिबंधक कायदा करण्यात आला असून, त्याचे पालन होत असल्याचे दिसत नाही. उलट स्त्रियांचे लैंगिक शोषण करणे हे धंदे जोरात सुरू आहेत. खरातने दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता जमवली असल्याची माहिती आहे. सत्ताधार्‍यांचे राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी वेगाने काम करणार्‍या तपास यंत्रणा या खरातसारख्या व्यक्ती अचाट संपत्ती जमवत असताना झोपलेल्या असतात का? याप्रकारचे वास्तव देशात ठिकठिकाणी पाहायला मिळते. हरियाणात तक्रार केल्यापासून 15 वर्षे बाबा रामरहीम हा मोकाट राहतो. त्याने 300 महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप होता. निवडणुका आल्या की, अटकेत असलेला हा बाबा पॅरोलवर बाहेर येतो. त्याबद्दल कोणालाही काही आक्षेपार्हही वाटत नाही. उत्तर भारतात असे अनेक बाबा-बुवा आहेत. सुधारणावादी महाराष्ट्रातही गावोगावी अधूनमधून अशा भोंदू बाबांचे प्रताप उघडकीस येत असतात. एकीकडे देशाची व राज्याची भौतिक प्रगती होत असताना लोकांची बौद्धिक हतबलता वाढत असेल, तर ते दुर्दैवी म्हणावे लागेल. कालबाह्य रुढी पोसण्यात या बाबा-बुवांचा महत्त्वाचा वाटा असतो.

दैवी शक्ती नावाची अनामिक भीती या भोंदू बाबा-बुवांना मोठे करण्यासाठी उपयुक्त ठरते. सामान्य माणूस परिस्थितीमुळे गांजलेला असतो. त्याच्या हतबलतेचा फायदा काही बुवा घेतात. त्यांच्या भोवती चमत्कारिक शक्तीच्या भाकडकथा पेरल्या जातात. आजच्या आधुनिक आणि विज्ञानवादी काळात अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे, हे वाईट आहे. अंधभक्तांच्या मतपेटीचा फायदा घेण्यासाठी या बाबा-बुवांना राजकीय नेते जवळ करतात आणि राजकीय सत्तेचा वापर आपल्या फायद्यासाठी हे बाबा-बुवा करून घेत असतात. यामध्ये सामान्य माणसे मात्र भरडून निघत असतात.

ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधु ॥

अंगा लावोनिया राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥

अशा शब्दांत तुकोबांनी भोंदू बाबांचा समाचार घेतला आहे. यातले मर्म आपल्या समाजाला केव्हा समजणार?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news