

सुनील माळी
भोंदूबाबा अशोक खरात याच्या अमानुष, नीच लीला बाहेर येऊ लागल्या अन् अनेक राजकारण्यांपासून ते अधिकार्यांपर्यंतच्या सर्वांचे त्याच्याशी असलेले संबंध पुढे येऊ लागले. बुवा-महाराज-बाबा-महंतांच्या वाढत्या बुजबुजाटाची अपरिहार्य परिणती अशा विषारी फळांमध्ये होणारच होती; पण खरा प्रश्न हा आहे की, या बुजबुजाटाच्या आहारी जाणार्या समाजाला यानिमित्ताने तरी भान येईल का?
वैयक्तिक जीवनातली धार्मिकता आणि श्रद्धेला कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही; पण त्याचे प्रस्थ माजल्याने त्याच्या अतिरेकाने विवेकवादाचा, बुद्धिप्रामाण्यवादाचा, तर्कसंगत विज्ञानवादी विचारसरणीचा बळी जात असेल आणि त्यायोगे कोणी खरातबाबा लैंगिक, आर्थिक शोषण करीत असेल, तर त्याचा विचार करायचा का नाही?
नेमकं काय झालंय?... थोडा बारकाईनं विचार केला, तर काही गोष्टी आपल्याला लख्खपणे उलगडतील. पहिली गोष्ट धकाधकीचे, स्पर्धेचे, अस्थिरतेचे प्रमाण पराकोटीला पोहोचल्याने सामान्य माणसाला कसला तरी आधार लागू लागला. त्यातून बाबा-बुवा-महाराज-महंतांचा बुजबुजाट होऊ लागला. बाबा दिवंगत असतील, तर त्यांच्या मठात, आश्रमात होणार्या उत्सव, उरूस, जयंती, पुण्यतिथी-सप्ताहांच्या कार्यक्रमांना गेल्या काही वर्षांत वाढलेली गर्दी थक्क करणारी आहे. हेच बाबा-बुवा जिवंत असतील, तर मग बघायलाच नको. फक्त त्यांच्या पायावर डोके ठेवून या भक्तांचे समाधान होत नाही, तर त्यांचे पाय ताटात (त्यांचा शब्द आहे ताम्हणात) ठेवून ते स्वतःच्या हाताने धुतले जातात. त्यांना हार घालून त्यांची आरती केली जाते. त्यांनी सांगितलेले काळे तीळ कुठेकुठे ठेवले जातात, कोणत्यातरी ठिकाणच्या वाहत्या पाण्यात नारळ (पुन्हा त्यांच्या शब्दांत श्रीफळ) टाकला जातो (नव्हे, अर्पण केला जातो.), कसला तरी पाठ कोणत्या तरी ठरावीक वारी म्हटला जातो, कोणत्या तरी वारी उपवास केला जातो, कोणत्यातरी तीर्थक्षेत्री जाऊन कसलातरी पूजाविधी केला जातो वगैरे, वगैरे... हे होते कारण या क्रिया केल्या, तर तुमची सर्व दुःखांतून सुटका होणार असते. हे सगळे कर्मकांड केल्यानंतर तुमच्या आयुष्यावर हवा तसा परिणाम होईल किंवा होणार नाही; पण हे करणार्याला भरभक्कम मानसिक आधार मिळतो. बळ मिळते. ही कर्मकांडे केल्याचा उपयोग झाला नाही, तरी ते कळायला वेळ जावा लागतो आणि त्या वेळात माणूस सावरला जातो. या कारणामुळेच गर्दीत वाढ होते.
समाजाचे हे असे वाढत चाललेले मानसिक दौर्बल्य अचूक ओळखणारा एक चाणाक्ष गट कार्यरत असल्याचे आपल्याला दिसून येते. हा गट आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर, अचूक उपयोग करतो. वेगवेगळ्या बाबा-बुवा-साध्वींचे सत्संगांचे मोठमोठ्या मांडवात कार्यक्रम आयोजित केले जातात. पॉडकास्टद्वारे लाखोंपर्यंत बुवा पोहोचतात. समाजाला भेडसावणार्या खर्या समस्यांना भिडण्याऐवजी आणि त्यांच्यावर विचार करण्याऐवजी समाज या कर्मकांडामध्ये रमतो आणि वास्तविक प्रश्नांपासून दूर जातो. कळत-नकळत बुवा-बाबांचे प्रस्थ वाढत जाते, समाजाचे भान सुटते. या सगळ्या वाढत्या प्रस्थाला आलेल्या विषारी फळांपैकी एक म्हणजे भोंदू खरातबाबा. असे अनेक खरातबाबा आपल्या आसपास खुलेआम वावरत आहेत. समाजाच्या भोळसटपणाचा गैरफायदा उठवत आहेत. ज्यांचे फोटो अनेक वर्षे देवघरात लावले, तेच गजाआड गेल्याने गुपचूपपणे ते फोटो बाहेर काढण्याची वेळ काही वर्षांपूर्वी शेकडो भक्तांवर आली होती ना? आता हे बाबा एकटे नसतात, तर ‘बाबा इंडस्ट्री’च उदयाला येते. बाबा-बुवा गावात येण्यापूर्वी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या दिल्या जातात, गावातल्या श्रीमंतांकडे बाबांची पायधूळ झाडण्यासाठीच्या वेळा बुक केल्या जातात आणि त्यापोटी काही लाखांच्या घरात जाणारी ‘ऐच्छिक’ (?) देणगीही स्वीकारली जाते. अशा भेटींमध्ये बाबांची आरती करणे, त्यांना ओवाळणे, त्यांचे पाय धुणे नव्हे नव्हे पदप्रक्षालन करणे आदी कार्यक्रम साग्रसंगीत पार पडले जातात. बाबांनी त्यांच्या आश्रमात बांधलेल्या मंदिरात भक्तांच्या नावे अभिषेक करण्यासाठी पावत्या फाडल्या जातात. ध्वनिफितींच्या म्हणजे कॅसेटच्या काळात बाबांच्या प्रवचनांच्या कॅसेट विकल्या जात. आता तीच जागा यूट्यूबच्या प्रवचनांनी घेतली आहे. यूट्यूबवर जेवढे लाख प्रेक्षक येतील, तेवढ्या प्रमाणात डॉलर्सची कमाई होत राहते.
या ‘बाबा इंडस्ट्री’मुळे आपल्याला उलगडत गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे, समाज जसजसा आधुनिक होत जातो, सुशिक्षित होत जातो, तसतसा तो अधिकाधिक बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी, तर्कनिष्ठ होत जाणे अपेक्षित असते; पण दुर्दैवाने घडते आहे ते उलटेच. बुद्धिप्रामाण्यवादाऐवजी पोथीप्रामाण्यवादावर, ‘बाबा वाक्य प्रमाणम्’वर विश्वास ठेवणार्यांची संख्या वाढत जाते आहे आणि ती केवळ अल्पशिक्षित किंवा अशिक्षित वर्गातच नव्हे, तर उच्च शिक्षितांमध्येही सारख्याच प्रमाणात आहे.
या विवेचनाचा अर्थ समाजाने धार्मिक असूच नये, असा अजिबात नाही. ‘धृ’ या धातूवरून ‘धर्म’ शब्द आलेला आहे. जो धारणा करतो तो धर्म. जो समाजाला धरून ठेवतो, समाजातील ऐक्यभावना वृद्धिंगत करतो तो धर्म. धर्म एक विचार सांगतो, एकच एक तत्त्व सांगतो. ते म्हणजे, ‘या विश्वात सर्वत्र व्यापून राहिलेली चैतन्यशक्ती म्हणजे परमेश्वर. ती जशी विश्वात आहे तशीच तुझ्यातही आहे. तुझं शारीरिक टरफल बाजूला करून तुझ्यातल्या चैतन्यशक्तीचा विश्वात्मक शक्तीशी झालेला संयोग तू याच देही अनुभवावा. तो अनुभव तू द्वैतमार्गाने, भक्तिमार्गाने घे म्हणजेच परमेश्वरी शक्ती मूर्तीरूपात असल्याची कल्पना करून तिची भक्ती कर किंवा केवळ अद्वैत मार्गाने, ज्ञान मार्गाने घे म्हणजेच ध्यान, धारणा, समाधीने त्या शक्तीशी एकरूप हो.’ बस, एवढाच आहे अध्यात्माचा पाया. त्याला पुढे लबाड, स्वार्थी माणसांनी कर्मकांडाची पुटं चढवली. गंडे-दोरे-धुपारे-पारायणे-उपास-पूजापाठ-जप-सप्ताह-तीर्थक्षेत्रांची दर्शने-होम-हवन आदींमध्ये समाजाला गुंगवले अन गुंतवले जाते. या कर्मकांडांनी आपला ऐहिक उत्कर्ष होईल, याची आशा केली जाते. वास्तविक जप-पूजापाठ करताना स्वतःचे अस्तित्त्व विसरून आपल्या उपास्य दैवतात विलीन होणे, याचे नाव भक्तियोग; मात्र केवळ कोरड्या विधींमध्येच भाविक गुंतून पडतात. अशा कर्मकांडांचा आपली ऐहिक स्थिती सुधारण्याशी काहीही संबंध नाही. ती स्थिती सुधारते ‘यत्न तो देव जाणावा’ या संतवचनाने म्हणजेच प्रयत्नांच्या सातत्याने; पण हा विवेक त्यांना राहत नाही. यातून बाबा-बुवांचे फावते आणि पुढे त्याच बाबांकडून लैंगिक शोषणासारखी घृणास्पद कृत्ये केली जातात. अशा बाबांबाबत चीड येतानाच आश्चर्यही वाटत राहते ते बाबाने लगट करण्याचा प्रयत्न सुरू केला त्या क्षणी सावध होऊ न शकलेल्या दुर्दैवी सावजांचे आणि अगदी त्यांच्या नातलगांचे. या नातलगांत अगदी नवराही असतो, हा आश्चर्याचा दुसरा धक्का!
या धार्मिक पिळवणुकीविरोधात अनेकांनी बंड केले. गौतम बुद्ध, कबीर, जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याने समाजात पुरोगामी विचारांचे वारे वाहू लागले. दुर्दैवाने गेल्या काही दशकांत पुन्हा कर्मकांडाचा पगडा समाजावर वाढू लागल्याचे आणि समाजाची सामूहिक शक्ती त्यातच गुंतून पडल्याचे दिसू लागले आहे. वर्षातले मोजके सण पूर्वी रस्त्यांवर, चौकांत साजरे व्हायचे आणि इतर सण हे व्यक्तीशः घरात होत असत; पण आता रस्त्यावर होणार्या सण-समारंभांची, मिरवणुकांची, स्पीकरच्या कर्कश्य दणदणाटाची संख्या अतोनात वाढली आहे. त्याला राजकीय पाठबळही किती मिळते, ते सुज्ञांना सांगायला नकोच. बाबा-बुवांचे पीक फोफावण्यासाठी ही सुपीक जमीन होती. अर्थात, पूर्वापार निष्ठेने उदात्त ध्येय बाळगून या मातीतल्या धर्म विचाराचा प्रसार करणारे, त्याद्वारे सामाजिक ऐक्य साधण्याचा, नैतिकमूल्ये लहानपणापासूनच रुजवण्याचा प्रयत्न करणारे मोजके जन होतेच आणि आहेतही. भोंदूबाबा आणि या निष्ठावान संस्था यांच्यातला फरक सामान्य जनांना समजून येत नाही आणि ते भोंदूबाबांना फसतात, ही खरी समस्या आहे. आपल्या दैनंदिन जीवनाचा किती भाग या धार्मिक सहभागाला द्यायचा, याचेही भान ठेवायला हवे. भागवत धर्माचे महान संत जगद्गुरू तुकाराम महाराज धार्मिक नव्हते, असे कोण म्हणेल? त्यांची पांडुरंगावरील भक्ती ‘भेटी लागी जिवा लागलीसे आस’सारख्या अभंगांनी आपल्या काळजाला भिडते; पण तेच परखड तुकोबा हे खरातसारख्या लंपट, भोंदूबाबांवर शाब्दिक चाबकाचे फटकारे कसे ओढतात, ते पाहा...
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥
काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥
अल्प असे ज्ञान । अंगी ताठा अभिमान ॥
तुका म्हणे लंड । त्याचे हाणोनि फोडा तोंड ॥
ढोंगी बुवाचे थेट तोंडच फोडण्याचा सल्ला तुकाराम महाराज देतात.
पुढचा अभंग तर थेट भोंदू खरातबाबासाठीच आहे.
परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥
जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर (गाढव) ॥
सोवळ्याची स्फीती (प्रतिष्ठा) । क्रोधे विटाळला चित्ती ॥
तुका म्हणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥
दुसर्याचे द्रव्य आणि स्त्रीवर डोळा ठेवून हे भोंदूबाबा नाक धरून अनुष्ठानाचे सोंग करतात, गाढवाप्रमाणे खोटी प्रतिष्ठा वाहणार्या या बुवांच्या अशा वागणुकीला आग लागो, असे जळजळीत शब्द तुकोबा उच्चारतात.
पुढे आणखी पाहा...
वेष धरला साधूचा । अंतरी वासना काचा ॥
टिळा टोपी उंच दावी । जगी मी एक गोसावी ॥
अवघा परपंग सारा । पोटी विषयांचा थारा ॥
टिळा-टोपी घालून मीच खरा गोसावी आहे, असा दावा हे दांभिक बाबा करतात; पण त्यांच्या पोटात वासनाच असतात, असे तुकाराम महाराज निदर्शनाला आणून देतात.
भोंदूबाबांविषयी तुकाराम महाराजांच्या रचनांमधील शेवटचा दाखला पाहा.
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥
अंगा लावुनिया राख । डोळे झाकुनी करिती पाप ॥
दावुनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा ॥
तुका म्हणे सांगो किती । जळो तयांसी संगती ॥
अंगाला राख लावून पाप करणार्या या वासनांध, नराधम बुवा-बाबांच्या मायाजाळातून भोळसट जनतेला बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कानी तुकोबारायांचे हे खरमरीत शब्द सातत्याने पडणे आवश्यक आहे, असे वाटते ना?