नवरात्रौत्सवात आदीशक्तीचा जागर file photo
जालना

Navratri 2026 : नवरात्रौत्सवात आदीशक्तीचा जागर

घटस्थापनेने शारदीय उत्सवास सुरुवात, भक्तीमय व चैतन्यमय वातावरणाने परिसर भारावला

पुढारी वृत्तसेवा

jalna Navratri Festival devotees

जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात रविवारी (दि.११) पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळे तसेच देवीच्या मंदिरांमध्ये विधिवत पूजा, मंत्रोच्चार आणि घटस्थापना करण्यात आली. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

जालना शहरातील विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने सकाळपासून देवीच्या मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजाअर्चा करून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अनेक ठिकाणी होमहवन आणि मंत्रोच्चार करण्यात आले. 'उदे गं अंबे उद्दे' सह देवीच्या विविध भक्तिगीतांनी मंडळांचा परिसर दुमदुमून गेला होता. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. घटस्थापनेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठीही नागरिकांची लगबग दिसून आली.

शहरातील विविध चौकांमध्ये माती, घट, फुले तसेच पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची दुकाने सजली होती.. या दुकानांमध्ये सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ होती. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जालना शहरातील दुर्गामाता, काळुका माता आणि तुळजाई देवी मंदिरांसह जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांवर नवरात्रोत्सवानिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. अंबड तालुक्यातील मत्स्योदरी देवी मंदिर, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील रेणुकाई देवी मंदिर, आन्वा येथील आजुबाई मंदिर, बदनापूर तालुक्यातील सोमठाणा तसेच मंठा आणि परतूर तालुक्यांतील देवीच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे.

नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत या मंदिरांमध्ये देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. विविध धार्मिक विधी, पूजाअर्चा आणि भक्तिमय कार्यक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्यातील वातावरण देवीमय होणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात सुरू झालेल्या नवरात्रोत्सवामुळे जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभुमीववरही नागरीकांचा उत्साह कायम आहे.

दांडीयाचे सुर घुमणार

जालना शहरासह जिल्ह्यात आगामी नऊ दिवस दांडीयाच्या सुरावर तरुणाई थिरकणार आहे. शहरात अनेक ठिकाणी नवरात्रोत्सव मंडळाच्यावतीने दांडीया खेळण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत विविध गाण्यांच्या तालावर टिपऱ्याच्या तालावर तरुण-तरुणी फेर धरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT