जालना : जालना जिल्हा बँक घोटाळ्याचे केंद्र बनल्याचे मागील काही महिन्यांच्या घडामोडीवरुन पहावयास मिळत आहे. मागील तीन महिन्यांत मोतीराम अग्रवाल जालना मर्चण्टस बँकेत 23 कोटी 33 लाख, पूर्णवादी बँकेच्या जालना शाखेत 8 कोटी 12 लाख तर बदनापूर येथील राष्ट्रीयीकृत बँक असलेल्या कॅनरा बँकेत 7 कोटी 32 लाख रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. यामुळे जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्र हादरले असतानाच अनेक व्यापाऱ्यांनाही याचा मोठा फटका बसल्याने जालन्याच्या अर्थकारणाचे चक्र मंदावले आहे.
जालना जिल्ह्यात मागील एक महिन्यात मोतीराम अग्रवाल जालना मर्चण्टस बँकेसह पूर्णवादी बँक व त्या पाठोपाठ बदनापूरच्या कॅनरा बँकेत घोटाळा झाल्याने बँकेच्या ठेवीदार प्रचंड अडचणीत आले आहे.जिल्ह्यात यापूर्वी मंठा अर्बन बँकेसह बीएचआर बँकही अनियमिततेमुळे बंद झाल्या आहेत.जालना मर्चण्टस व पूर्णवादी बँकाच्या घोटाळ्याचा परिणाम इतर बँका व पतसंस्थांवर होण्याची भिती असल्याने बँकिंग क्षेत्रावर याचा परिणाम होण्याची परिस्थिती आहे.
शहरातील दोन तीन को ऑपरेटीव्ही बँकाही ऑक्सिजनवर असल्याची चर्चा असून त्या बंद झाल्यास ठेवीदारांसह व्यापाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.जिल्ह्यातील व्यापारी वर्ग बँक घोटाळ्यामुळे भयभीत असून को ऑपरेटीव्ह बँका सोबतच आता राष्ट्रीयीकृत बँकातही घोटाळे होउ लागल्याने ठेवीदारांनी विश्वास कोणावर ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जालना मर्चण्टस बँकेत शंभर कोटीच्यावर ठेवी ग्राहकांच्या आहेत.आज पैसे असूनही बँकेच्या ग्राहकांची अवस्था भिकाऱ्या सारखी झाली आहे. कष्टाचा पैसे सुरक्षीत राहतील कसे या विवंचनेत आज जिल्ह्यातील नागरीक आहेत.खासगी बँकाचा दिखाऊपणा ग्राहकांना आकर्षित करण्यास कारणीभूत ठरत असला तरी तो कितपत विश्वासार्ह आहे हे बँक घोटाळ्याने समोर आणले आहे. जिल्ह्यात बँकामधे झालेल्या घोटाळ्यांमधे कुंपणानेच शेत खाल्याचे पहावयास मिळाले.
अर्थकारण विस्कळीत
जालना जिल्ह्यात तीन बँकांत झालेल्या जवळपास 38 कोटी 77 लाख रुपयांच्या बँक घोटाळ्यांनी जिल्ह्याचे अर्थकारणाची गाडी पटरीवरून खाली उतरली आहे.जालना मर्चण्टस व पूर्णवादी बँकेत शेतमाल तारण ठेवून बनावट पावतीच्या आधारे कर्ज घेउन घोटाळा झाला असतानाच कॅनरा बँकेत बनावट सोने व ठेवलेले सोने गायब करून घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.