Jalna Market Committee records highest arrival of gram
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ७ मार्च रोजी विविध शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक झाली असून एकूण १३ हजार ८१६ क्विंटल शेतमालाची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीच्या दैनंदिन अहवालातून समोर आली आहे. या व्यवहारांमधून एकूण ६ कोटी ६७ लाख ५८ हजार ३८२ रुपयांची उलाढाल झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.
या दिवशी बाजार समितीत हरभऱ्याची सर्वाधिक ४ हजार ५४७क्विंटल आवक झाली. हरभऱ्याला कमाल ५१८१ रुपये, किमान ४८५० रुपये तर सरासरी ५१०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र दिसून आले.
तसेच तूर (पांढरी) २३४२ क्विंटल एवढी आवक झाली असून तुरीला कमाल ७९२५ रुपये, किमान ६००० रुपये तर सरासरी ७७५० रुपये असा दर मिळाला. तूर (लाल) या जातीची ४९२ क्विंटल आवक झाली असून तिला सरा-सरी ७७५० रुपये दर मिळाला.
कापूस (सीसीआय) या प्रकारची १६७ क्विंटल आवक झाली असून त्याला सरासरी ७९७० रुपये दर मिळाला. खासगी कापसाला ७४६० रुपये सरासरी दर मिळाल्याचे बाजार समितीच्या अहवालात नमूद आहे.
याशिवाय गहू, बाजरी, राजमा, राई, चिंच, गूळ आणि मोसंबी या शेतमालाचीही आवक झाली. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध शेतमालाची चांगली आवक झाली असून हरभरा, तूर आणि सोयाबीन या पिकांना समाधानकारक दर मिळाला.
सोयाबीनला ५३०० रुपये सरासरी दर
दरम्यान सोयाबीनची १४२५ क्विंटल आवक झाली असून त्याला कमाल ५५०० रुपये, किमान ५००० रुपये आणि सरासरी ५३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. ज्वारीची १०५२ क्विंटल तर मक्याची १००३ क्विंटल एवढी आवक नोंदविण्यात आली. ज्वारीला सरासरी ३७०१ रुपये, तर मक्याला १५५० रुपये दर मिळाला.