Jalna kerosene quota pudhari photo
जालना

Jalna kerosene quota : जिल्ह्याला केरोसिनचा 1.8 लाख लिटर कोटा मंजूर

गॅस टंचाईवर केरोसिनची मात्रा, प्रशासन आदेशाच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

जालना : आखाती देशांतील युद्धामुळे देशभरात इंधन संकटाचे सावट गडद होत असतानाच जालना जिल्ह्यात घरगुती गॅसच्या टंचाईवर आता केरोसिनचा मात्रा देण्याचे काम प्रशानाने हाती घेतले आहे. त्यापोटी जालना जिल्ह्यासाठी सुमारे 1.8 लाख लिटर केरोसिनचा कोटा मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, आठवडाभरापूर्वी पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. ती आटोक्यात येण्याआधीच आता गॅस टंचाईने नागरिकांच्या अडचणींमध्ये मोठी भर घातली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत ग्राहकांनी बुकिंग करूनही 10 ते 15 दिवस गॅस सिलेंडर घरपोच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक गॅस एजन्सींनी घरपोच सेवा बंद केल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, ग्राहकांना स्वतः एजन्सीच्या गोडाऊनवर जाऊन सिलिंडर घ्यावा लागत आहे. त्यासाठी तासन्‌‍तास रांगेत उभे राहण्याची वेळ येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

शहरातील सर्वच गॅस एजंसीवर सिलिंडर मिळवण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या दरात 73 रुपयांची वाढ झाल्याने आर्थिक भारही वाढला आहे. यापूर्वी 851 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 922 रुपयांना मिळत असल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी 1 लाख 8 हजार लिटर केरोसिन पुरवठा मंजूर करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, हा पर्याय तात्पुरता दिलासा देणारा असला तरी गॅस टंचाईवर कायमस्वरूपी उपाय आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

13 वर्षांनंतर पुन्हा रॉकेल वितरण

आखाती देशांतील युद्धस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने केंद्र सरकारने रॉकेल वितरणाचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यासाठी 1 लाख 8 हजार लिटर (108 केएल) रॉकेलचा कोटा मंजूर झाला आहे. अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारकांना प्राधान्य देत प्रत्येक कुटुंबाला 3 लिटर रॉकेल देण्यात येणार आहे. जिल्ह्यात 3 लाख 8 हजार प्राधान्य कुटुंबे व 43 हजार अंत्योदय लाभार्थी आहेत. रेशन दुकाने व परवानाधारक विक्रेत्यांमार्फत वितरण होणार आहे.

गॅस टंचाईबाबत पुरवठादार कंपन्यांचे समन्वयक, जिल्ह्यातील वितरक यांचसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन द्वारपोच गॅस सिलिंडर सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वितरकांना ग्राहकांकडून दोन दोन सिलिंडरची मागणी करण्यात येते. यामुळे वाद होतात. यामुळे कर्मचारी सिलिंडर नेण्यास असमर्थता दाखवतात, असेही वितरकांकडून सांगण्यात आले. पण, आता वितरकांना द्वारपोच सेवा पूर्ववत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी,जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT