

कोल्हापूर : आखाती देशांत सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट नागरिकांच्या स्वयंपाकघरापर्यंत उमटू लागले आहेत. कतारमधील गॅस निर्मितीत 40 टक्के घट झाल्याने देशभरात एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. या तुटवड्याचे संकट केवळ घराघरांतील चुलींपुरते मर्यादित राहिलेले नाही; तर समाजातील अनेकांच्या पोटाशी निगडित असलेल्या अन्नसेवा व्यवस्थांवरही ते गंभीरपणे कोसळताना दिसत आहे. शिक्षणासाठी बाहेर राहणार्या विद्यार्थ्यांच्या मेस, वृद्धाश्रम व अनाथालयांतील स्वयंपाकगृहे, शालेय पोषण आहार केंद्रे, तालीम, व्यायामशाळांमधील भोजन व्यवस्था, सरकारी रुग्णालयांतील मोफत अन्नछत्रांपुढे ‘सिलिंडर जपून वापरणे किंवा इंधनाचा दुसरा पर्याय शोधणे’ हा कठीण प्रश्न उभा ठाकला आहे. जगाच्या एका कोपर्यात धगधगणार्या युद्धाची ज्वाला आता लोकांच्या रोजच्या जेवणाच्या ताटापर्यंत पोहोचू लागल्याने या परिस्थितीचे चटके दाहक झाले आहेत.
शालेय पोषण आहार केंद्र, विद्यापीठ वसतिगृहासह खासगी मेसमध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने ऐन परीक्षाकाळात जेवणव्यवस्थेची कसोटी लागत आहे. शिवाजी विद्यापीठात मुले व मुलींच्या आठ मेस आहेत. याठिकाणी 750 मुलांसाठी तर 1400 मुलींसाठी जेवण बनवले जाते. दरमहा 65 सिलिंडर लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी मासिक पुरवठा देण्यासंदर्भात गॅस एजन्सीकडून गॅस पुरवठा करण्याचे आश्वासन मिळाले आहे. सध्या तरी गैरसोय नाही.
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंत तीन हजार शाळांमध्ये पंतप्रधान पोषण आहार योजना राबविण्यात येते. लाभार्थी विद्यार्थी संख्या 3 लाख 20 हजार 958 एवढी आहे. सर्वच शाळांमध्ये स्वयंपाकासाठी गॅस सिलिंडर वापरले जातात. गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असून शालेय पोषण आहार ठेकेदार मदतनीस स्वयंपाकी यांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिली जात नाहीत, असे कळविले आहे.
रुग्णांची आहारसेवा सुरळीत
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या सीपीआर परिसरातील उपाहारगृह गॅस टंचाईमुळे शनिवार, दि. 14 पासून बंद राहणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांसह डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचार्यांना नाश्ता, जेवणाची समस्या निर्माण होणार आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी असलेल्या रुग्ण आहारगृहातर्फे सध्या गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था सुरळीत सुरू आहे.
कुस्ती, व्यायामासाठी तालीम मंडळांत राहणार्या पैलवानांना स्वयंपाकासाठी एक सिलिंडर दोन महिने पुरते. अनेक पैलवान आसपासच्या खेडेगावातील असल्याने त्यांना जेवण त्यांच्या गावातून येते. सध्या यात्रा आणि स्पर्धांचा हंगाम असल्याने पैलवानांची गावोगावी फिरती सुरू आहे. यामुळे तालमीतील सिलिंडर गॅसचा वापर होत नसल्याने त्याची बचतच होत असल्याची माहिती वस्तादांनी दिली.
शहरातील अनाथालय, वृद्धाश्रमांमध्ये निराधार मुले, तसेच आजारी वृद्धांचा सांभाळ केला जातो. अत्यावश्यक घटक असल्याने जिल्हा प्रशासनाकडून सिलिंडर देण्यासाठी प्राधान्य दिले असले तरी या संस्थांनी गॅसबरोबरच चुलींचा आधार घेतला आहे. बालकल्याण संकुलमध्ये 200 अनाथ मुलांच्या जेवणासाठी दरमहा 20 सिलिंडर लागतात; तर सावली केअर सेंटरमध्ये 300 आजारी वृद्धांकरिता बनणार्या जेवणासाठी रोज दोन सिलिंडर लागतात. मातोश्री वृद्धाश्रम, श्रावणी समर्थ केअर सेंटर या वृद्धाश्रमांध्येही दीडशे ते दोनशे ज्येष्ठ नागरिक आहेत.
जिल्ह्यातील शिवभोजन कक्षांना शासनाकडून मिळणारे मानधन तब्बल नऊ महिन्यांपासून 5 कोटी रु. थकीत असल्याने आणि त्यातच गॅस टंचाई निर्माण झाल्याने अनेक कक्ष चालविणे अवघड आहे. त्यामुळे काही ठिकाणी शिवभोजन कक्ष बंद ठेवण्याची वेळ आली आहे. शहरात 20, इचलकरंजी शहरात 11 तर ग्रामीण भागात 20 कक्षांचा समावेश आहे. याअंतर्गत ग्राहकांना फक्त 10 रुपयांत जेवण दिले जाते. वाढता खर्च आणि आता निर्माण झालेली गॅस टंचाई यामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.