Jalna mobile shop theft pudhari photo
जालना

Jalna mobile shop theft : रेल्वे स्टेशन परिसरातील मोबाईल शॉपी फोडली; पत्र उचकटून १४ मोबाईलसह २५ हजारांचा मुद्देमाल पसार!

अज्ञात चोरट्याकडून सीसीटीव्हीची मोडतोड; कदीम जालना पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

जालना : जुना जालन्यातील रेल्वे स्टेशन गेट व इन्कम टॅक्स ऑफिसजवळ असलेल्या 'ईशा मोबाईल शॉपी'चे छत व मागचा पत्रा उचकटून अज्ञात चोरट्याने दुकानातील दुरुस्तीसाठी आलेले १४ मोबाईल फोन आणि ब्लूटूथ साहित्यासह सुमारे २५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुखी नगर (जुना जालना) येथील रहिवासी शेख नईम शेख सलीम (वय ४२) यांचे रेल्वे स्टेशन गेटजवळ 'ईशा मोबाईल शॉपी' नावाचे दुकान आहे. १८ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास शेख नईम नेहमीप्रमाणे दुकान बंद करून कुलूप लावून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी (१९ सप्टेंबर) सकाळी १०:३० वाजता त्यांनी दुकान उघडले असता, आतील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले.

संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडलेला आढळला. दुकानाच्या मागील बाजूस जाऊन पाहिले असता चोरट्याने मागील पत्र उचकटून आणि फॉल्स सीलिंग तोडून आत प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले.

चोरट्याने दुकानात ग्राहकांनी दुरुस्तीसाठी दिलेले सॅमसंग, ओप्पो, व्हिव्हो, वनप्लस, रिअलमी, मोटो आणि एमआय कंपनीचे १४ मोबाईल फोन तसेच ब्लूटूथ इअरबड्स, स्पीकर बार व हेडफोन असा एकूण २५ हजार रुपये किमतीचा ऐवज लांबवला.

या प्रकरणी शेख नईम शेख सलीम यांच्या तक्रारीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात मंगळवार, दि. २९ रोजी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३३४(१) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व जुने वापरायचे दुरूस्ती करण्यासाठी आलेले १५ मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामप्रसाद केवट पुढील तपास करत आहेत.

जालना शहरातील वाढत्या चोऱ्यांमुळे कदीम जालना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. चोरट्यांना पकडून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT