

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणी योजनेतून शहराला पाणीपुरवठा सुरू झालेला असतानाच मंगळवारी (दि.२९) दुपारी हसूल टी पॉइंटजवळ ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी पुन्हा फुटल्याने हसूल परिसरातील तीन ते चार वसाहतींना निर्जळीचा सामना करावा लागला. यापूर्वी दुरुस्ती करण्यात आलेली हीच जलवाहिनी पुन्हा फुटल्याने दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) उपअभियंत्यांसह कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. रात्री उशिरापर्यंत हे काम सुरू होते.
शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत हर्मूल ते जटवाडापर्यंत १,५०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या मुख्य जलवाहिनीला ७०० मिमी व्यासाची पाइपलाइन जोडण्यात आली आहे. ही जोड पाइपलाइन हसूल टी पॉइंटजवळ मंगळवारी दुपारी अचानक फुटली. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला.
विशेष म्हणजे, याच पाइपलाइनची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, दुरुस्तीचे काम व्यवस्थित न झाल्याने ती पुन्हा फुटल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पाइपलाइन फुटल्याची माहिती मिळताच मजीप्राच्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्राटदार कंपनीच्या कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. पाइपलाइन दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी पाइपलाइन फुटल्याची माहिती मजीप्राला देऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.
या पाइपलाइनमधून हर्मूल भागातील तीन ते चार वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र सोमवारी या भागाचा पाणीपुरवठ्याचा टप्पा असतानाही पाणी मिळाले नाही. त्यातच मंगळवारी पाइपलाइन फुटल्याने नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागला. जलवाहिनी दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखी वेळ लागण्याची शक्यता निर्माण झाली. तसेच नवीन योजनेतील जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या स्थैर्याबाबतही नागरिकांकडून चिंता व्यक्त होत आहे.
जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर
पाणी वायाहर्सल टी पॉइंटजवळ ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहून गेले. याच जलवाहिनीची यापूर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, पुन्हा पाइपलाइन फुटल्याने दुरुस्तीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. नेहमीच्या जलवाहीनी फुटीमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.