जालनाः अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामीची धमकी देत नागरिकांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या महिलेसह सहा जणांची टोळी चंदनझिरा पोलिसांनी जेरबंद केली.आरोपींसह पोलिस अधिकारी व कर्मचारी. pudhari photo
जालना

Jalna Crime News : हनी ट्रॅपच्‍या जाळ्यात अडकवून नागरिकांना लुटले

मुख्य महिला आरोपीसह सहा जणांना चंदनझिरा पोलिसांनी केले जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

जालना : अश्लील व्हिडिओ तयार करून बदनामीची धमकी देत नागरिकांना जाळ्यात ओढून लूटमार करणाऱ्या टोळीचा चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या चार तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य महिला आरोपीसह सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी रात्री एका बोलेरो चालकास अडवून जबरदस्तीने वाहनात बसविण्यात आले. त्यानंतर त्याला एका ट्रायपॉइंट परिसरात नेऊन मारहाण करण्यात आली. आरोपींनी त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतला तसेच अश्लील व्हिडिओ तयार करून तो नातेवाईक व मित्रांना पाठविण्याची धमकी देत फोन-पेच्या माध्यमातून पैशांची लूट केली.

या घटनेची तक्रार २३ जून रोजी चंदनझिरा पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे मुख्य आरोपी असलेल्या महिलेस सिंदखेडराजा तालुक्यातील पांगरी उगले येथून ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील राजपूतवाडी येथे राहणाऱ्या अविनाश गणेश झोटे, अर्जुन चमन बहादूर राजपूत, शंकर माणिक जाधव, अतिष सतीश गायकवाड व सचिन लक्ष्मण कांबळे यांना अटक करण्यात आली.

तपासा दरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले ऑटो रिक्षा, मोबाईल फोन तसेच तक्रारदाराकडून लुटलेली रक्कम असा 2 लाख 61 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडल्या असतील आणि संबंधितांनी अद्याप तक्रार केली नसेल, तर त्यांनी निःसंकोचपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वीरसिंग संधू यांनी केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक तेजस्वीरसिंग संधू, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार व त्यांच्या पथकाने केली.

  • पोलिसांच्या तपासात मुख्य महिला आरोपीविरुध्द जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हनी ट्रॅपसह विविध गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती वेगवेगळ्या साथीदारांच्या टोळ्या तयार करून नागरिकांना जाळ्यात ओढत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT