जालना ः शहरात उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक डोक्यावर टोपी, विविध प्रकारचे मास्क, डोक्याला रुमाल बांधून प्रवास करत आहे.  (छाया ः जावेद तांबोली)
जालना

Weather update Jalna : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढला; नागरिक हैराण

दुपारच्या वेळी रस्ते ओस; आरोग्याची घ्यावी काळजी, प्रशासनाचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा लक्षणीय वाढला असून नागरिकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी दहाच्या सुमारासच सूर्याची कडक किरणे जाणवू लागतात, तर दुपारी बारा ते चार या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठा काही प्रमाणात ओस पडताना दिसत आहेत.

उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक थंड पाणी, सरबत, उसाचा रस आणि इतर थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत. शहरातील पाणी विक्री केंद्रांवर तसेच ज्यूस सेंटरवर गर्दी वाढली आहे. अनेक नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळत असून अत्यावश्यक काम असल्यासच बाहेर पडत आहेत.

दरम्यान, वाढत्या तापमानाचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय तज्ज्ञांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी व मजूर वर्गालाही वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे.

उष्मा लाटेपासून बचावासाठी काय करावे

  • पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा. दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.

  • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.

  • ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी. उन्हात अतिकष्टाची कामे करू नका. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

येत्या आठवडाभराचे तापमान

मंगळवार -38.19

बुधवार -38.22

गुरुवार -39.21

शुक्रवार -39.21

शनिवार -39.22

रविवार -34.21

सोमवार -37.21

उष्मालाटेपासून बचावासाठी दक्षता घ्यावी - उष्माघात ही उन्हाळ्यातील एक सामान्य समस्या आहे. ही समस्या तीव्र सूर्यप्रकाश किंवा उष्णतेच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्यामुळे होऊ शकते उन्हाळी हंगामातील उष्मालाटेमुळे उदभवणाऱ्या उष्माघातांनी मानव, पशु- प्राणी व शेती पिकांवर होणारे दुष्परिणाम टाळण्याच्या दृष्टीने उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता घ्यावी.
दीपक काजळकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जालना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT