Jalna groundwater level, pudhari photo
जालना

Jalna groundwater level : पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत भूजलपातळी ३.६९ मीटरने घटली

परतूरमध्ये सर्वाधिक ७.२३ मीटरची घट; ११० पैकी एकाही विहिरीची पातळी वाढली नाही!

पुढारी वृत्तसेवा

जालना : जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्याचा परिणाम आता भूजल साठ्यावरही स्पष्टपणे दिसून येत आहे. सप्टेंबर २०२६ मधील भूजलपातळीची तुलना मागील पाच वर्षांच्या सप्टेंबर महिन्यातील सरासरीशी केली असता, जिल्ह्यातील ११० निरीक्षण विहिरींपैकी तब्बल ११० विहिरींच्या भूजलपातळीत घट झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे एकाही निरीक्षण विहिरीची भूजलपातळी वाढलेली नाही. जिल्ह्याची सरासरी भूजलपातळी पाच वर्षांच्या सप्टेंबर सरासरीच्या तुलनेत तब्बल ३.६९ मीटरने खाली गेली आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सर्वेक्षणानुसार भूजल पातळीतील या घसरणीचा सर्वाधिक परिणाम परतूर तालुक्यावर झाला असून, तेथे भूजलपातळी तब्बल ७.२३ मीटरने घटली आहे. त्यानंतर घनसावंगी ५.२५ मीटर, भोकरदन ३.६२ मीटर, जालना २.९८ मीटर, बदनापूर २.८५ मीटर, अंबड २.७५ मीटर, मंठा २.५४ मीटर आणि जाफराबाद २.२५ मीटर अशी घट नोंदविण्यात आली आहे.

भूजलपातळीतील घसरणीबरोबरच जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाची तूटही नोंदली गेली आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत ३० ते ५० टक्क्यांपर्यंत पर्जन्यमानाची तूट असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. तर जालना, बदनापूर, परतूर आणि मंठा तालुक्यांत २० ते ३० टक्के, तसेच भोकरदन व जाफराबादमध्ये ० ते २० टक्के पावसाची तूट नोंदली गेली आहे.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने भूगर्भात पाण्याची पुरेशी पुनर्भरण प्रक्रिया होऊ शकली नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. परिणामी विहिरी, बोअरवेल तसेच अन्य भूजलस्रोतांवरील अवलंबित्व असलेल्या भागांमध्ये आगामी काळात पाणी उपलब्धतेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.

भूजलपातळीतील सातत्याने होणारी घट ही केवळ शेतीसाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठीही चिंतेचा विषय ठरत आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूजलसाठ्याचे पुनर्भरण न झाल्यास अनेक गावांना टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

भूजलपातळीतील ही घसरण लक्षात घेता पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, शेततळी, नाला खोलीकरण, बंधारे, सिमेंट नाला बांध यांसह विविध जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तसेच उपलब्ध भूजलाचा काटकसरीने वापर आणि पिकांच्या पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करणेही महत्त्वाचे ठरणार आहे.

११० पैकी ११० निरीक्षण विहिरींची भूजलपातळी घटली

  • भूजलपातळीत वाढ झालेली विहीर : शून्य

  • जिल्ह्याची सरासरी घट : ३.६९ मीटर

  • सर्वाधिक घट : परतूर — ७.२३ मीटर

  • सर्वात कमी घट : जाफराबाद — २.२५ मीटर

  • संभाव्य टंचाईग्रस्त गावे : २५४

  • घनसावंगीमध्ये ५.२५ मीटरची घट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT