जालना ः जालना महापालीकेच्यावतीने शहरात कचरा उचलण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या घंटागाडी चालकांचे तीन महिन्यांचे वेतन थकल्याने घंटागाडी चालकांनी शहरातील मस्तगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन केले. यावेळी वेतन न मिळाल्यास आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला. यामुळे शहर स्वच्छता व कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जालना शहरातील 55 प्रभागातील कचरा दररोज पहाटे घंटागाड्याव्दारे उचलला जातो. महापालिकेकडे 82 घंटागाड्या असून त्यापैकी 30 घंटागाड्या खराब झालेल्या आहेत. एक्सवेट व साई एजन्सीमार्फत घंटागाडी चालक 52 घंटागाड्याव्दारे कचरा उचलण्याचे काम करतात. या घंटागाड्या चालकांना मागील तीन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने घंटागाड्या चालकांनी बेमुदत संप सुरू केला आहे.
यामुळे शहरातील विविध वॉर्डांतील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. घंटागाड्या बंद झाल्यामुळे विविध वॉर्डांत आगामी काही दिवसांत कचऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या पावसाळा सुरू झाला असून कचऱ्यामुळे वॉर्डात घाण साचून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे.
शहरातील मस्तगड भागातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर घंटागाडी चालकांनी वेतन देण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून आंदोलन सुरू केले. सकाळी पाच ते दुपारी दोन वाजेपर्यंत ड्युटी केल्यानंतर तीन महिने पगार नसल्याने घरखर्च व मुलांच्या शाळेचा खर्च कसा करायचा या विंवचनेत घंटागाडी चालक आहेत.
तातडीने वेतन द्या
याबाबत घंटागाडी चालकांच्यावतीन महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून थकीत वेतन तातडीने करण्याची मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर विजय भुरेवाल, नितीन दाभाडे, अक्षय भुरेवाल यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.