Sindhudurg News : कुडाळ एमआयडीसीत 'कचरा' वाद पेटला!

स्थानिक आणि प्रशासन आमनेसामने; घंटागाड्या परतल्या
Sindhudurg News
एमआयडीसीतील जागेत टाकलेला कचरा पुन्हा घंटागाड्यात भरण्यास नागरिकांनी भाग पाडले.
Published on
Updated on

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या एमआयडीसीतील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेत कचरा टाकण्यास परिसरातील स्थानिक पिंगुळी - एमआयडीसीमधील नागरिक आणि उद्योजकांनी मंगळवारी पुन्हा एकदा एकवटत कडाडून विरोध केला. या जागेत सकाळी न.पं. प्रशासनाच्या घंटागाड्या कचरा घेऊन दाखल झाल्याचे माहीती मिळताच स्थानिक नागरिकांनी तेथे धाव घेत, कचरा टाकण्यास तीव्र विरोध दर्शवला. यादरम्यान नागरिक व प्रशासन यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. अखेर प्रशासनाने नमती भूमिका घेत, डंम्प केलेला कचरा पुन्हा घंटागाड्यांमध्ये भरून नेण्यात आला. दरम्यान, एमआयडीसीतील त्या जागेत कचरा डंम्पीग नकोच, शिवाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पही नको, अशी आग्रही भूमिका परिसरातील स्थानिक नागरिकांची असल्याची माहीती यावेळी स्थानिक नागरिक सुधाकर गाळवणकर यांनी दिली.

एमआयडीसीतील जी/२/२ या भूखंडावर कुडाळ न.पं.चा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र त्या जागेत हा प्रकल्प राबविण्यास स्थानिक नागरिक व उद्योजकांचा विरोध असून, नोव्हेंबर महिन्यात स्थानिक नागरिकांनी तेथे रस्त्यावर उतरत त्या जागेत कचरा प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला होता. त्यानंतर आ. नीलेश राणे यांनीही स्थानिक रहिवाशी नागरिक व उद्योजकांशी चर्चा करीत, हा प्रकल्प एकविसाव्या शतकातील टाॅप प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिक व उद्योजकांना कोणताही त्रास होणार नाही, याची हमी आपण देतो, असे सांगून समजूत काढत प्रकल्पाला सहकार्य करण्याची विनंती केली होती. तसेच प्रकल्पाचे प्रेझेंटेशन नागरिकांसमोर दाखवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर त्या जागेत प्रशासनाकडून संरक्षक भिंत उभारण्यात आली. मात्र, सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा या कचरा प्रकल्पाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

मंगळवारी सकाळी नगरपंचायत प्रशासनाच्या घंटागाड्या कचरा घेऊन एमआयडीसीतील त्या प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या जागेत दाखल झाल्या. याची माहीती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक व उद्योजकांनी एकवटत तेथे कचरा टाकण्यास तीव्र विरोध दर्शवला. याची माहिती मिळताच नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक पांडुरंग नाटेकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याशी नागरिकांनी चर्चा करीत, त्या जागेत कचरा टाकण्यास विरोध असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा श्री.नाटेकर यांनी नागरीकांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला मात्र नागरिक आपल्या भूमिकेशी ठाम राहीले. यावेळी स्थानिक नागरिक यावेळी सुधाकर गाळवणकर, सागर परब, डाॅ.संजय सामंत, डाॅ. आदेश पालेकर, मदन सामंत, सुनील देसाई, ओली फर्नांडिस, विकी वाडीयार, कपिल सामंत, प्रथमेश सामंत, राजन सामंत, राजू परब, चंदू पटेल, अनंत गाळवणकर, विलास हळदणकर, नीलेश प्रभू, ॲड. सुरेंद्र तेली आदींसह नागरिक उपस्थित होते. याबाबतची माहिती मिळताच न.पं.चे उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक मंदार शिरसाट, पिंगुळी जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर, सरपंच अजय आकेरकर यांनी तेथे भेट दिली. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनीही घटनास्थळी धाव घेत नागरीकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अखेर प्रशासनाकडून तेथे ओतण्यात आलेला कचरा पुन्हा घंटागाड्यात भरून डंम्पीग ग्राऊंडवर नेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news