Digital Fertilizer System pudhari photo
जालना

Digital Fertilizer System : शेतकऱ्यांच्‍या कृषी केंद्रावरील रांगा आता संपणार

२५ सप्टेंबरपासून खतांची मोबाईलवर खरेदी! , ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली जिल्ह्यात लागू!

पुढारी वृत्तसेवा

जालना: केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अनुदानित रासायनिक खतांची खरेदी अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद गतीने करता यावी, यासाठी 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' (Framework for Fertilizer Sale - FFS) ही मोबाईल आधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात येत्या २५ सप्टेंबर पासून या प्रणालीद्वारे खत विक्रीची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी या प्रणालीचा वापर करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या कृषी सेवा केंद्रांवर ई-पॉस (ePOS) मशीनद्वारे खतांची विक्री केली जाते. मात्र, शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी व खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने FFS मोबाईल ॲप आणले आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर जिल्ह्यात, तर दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट महिन्यात इतर ९ जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यात आली होती.

आता तिसऱ्या टप्प्यात २५ सप्टेंबर २०२६ पासून जालना जिल्ह्यासह राज्यातील उर्वरित सर्व जिल्ह्यांमध्ये FFS प्रणाली नव्याने लागू होत आहे. या प्रणालीमुळे शेतकर्‍यांना घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून पिकांच्या गरजेनुसार खतांची शिफारस पाहून आगाऊ बुकिंग करता येणार आहे.

पिकांच्या गरजेनुसार मिळणार खतांची शिफारस

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना मोबाईलवरून खताची आवश्यकता नोंदवता येणार आहे. ॲपमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ व पिकाची निवड केल्यानंतर 'जनरल फर्टिलायझर रिकमेंडेशन' म्हणजेच सामान्य खत शिफारस उपलब्ध होईल. त्यानुसार आवश्यक खताचा प्रकार व गोण्यांची संख्या निवडता येईल.

यानंतर जवळील खत विक्रेत्याची निवड करून बुकिंग सबमिट करताच युनिक क्यूआर कोड व टोकन नंबर प्राप्त होईल. वेगवेगळ्या दुकानांमध्ये खते उपलब्ध असल्यास एकापेक्षा जास्त विक्रेते निवडण्याची सुविधाही यात आहे. प्राप्त झालेला क्युआर कोड दाखवून दुकानदाराकडून ३ दिवसांच्या आत खत खरेदी करता येईल.

जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी एफएफएस प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करून खत खरेदी प्रक्रिया सुलभ व नियोजनबद्ध करावी. तसेच सर्व तालुका कृषी अधिकारी, खत विक्रेते व निरीक्षकांनी व्यापक जनजागृती करून शेतकऱ्यांना ॲप वापरण्यासाठी मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांना काही अडचण असल्याने तालुकानिहाय नेमलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण निरीक्षक आणि पंचायत समिती कार्यालयात कार्यरत गुण नियंत्रण निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.
पी. बी. बनसावडे, जिल्हा कृषी विकास अधिकारी, जि. प. जालना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT