जालना ः जालना जिल्ह्यातील जालना, अंबड, व घनसावंगी तालुक्यात झालेल्या 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 नैसर्गिक अनुदान घोटाळ्ा करण्यात आला होता. यात 1 कोटी 35 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या तलाठी पवनसिंग सुलाने यास आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून त्याला 6 दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामध्ये शासनाने वेळोवेळी जीआर काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. त्यामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यात याद्या अपलोडिंगचे काम करणाऱ्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस (शेती नावावर नसलेल्यांची) नावे याद्यामध्ये अपलोड करून त्यांच्या नावे आलेल्या शासनाच्या अनुदानाची रक्कम परस्पर लाटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदर प्रकरणात सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती गठीत केली होती.
चौकशी समितीने 240 गावांमध्ये 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांच्या शासकीय रकमेचा अपहार झाला असल्याबाबत अहवाल दिल्यानंतर सदर प्रकरणात पोलिस स्टेशन अंबड येथे गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे. सदर गुन्ह्यात यापूर्वी 11 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे.
आरोपी पवन सुलाने हा राजस्थानसह इतर राज्यात वास्तव्य करून तब्बल चार महिन्यांपासून वेळोवेळी मोबाईल व ठिकाणे बदलून पोलिसांना लोकेशन मिळू नये याची पूर्ण खबरदारी घेऊन अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होता. पोलिसांपासून लपवून राहण्यासाठी त्याने वेशभूषा बदलून तो फिरत होता.
सदर गुन्ह्यातील फरार आरोपींचा पवनसिंग हिरालाल सुलाने (रा. शेवगा, ता.जि. छ.संभाजीनगर याचा तांत्रीक विश्लेषणावरून पोलिस शोध घेत असताना तो छत्रपती संभाजीनगर येथे मिळून आल्याने त्यास सदर गुन्ह्यात अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 6 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. सदर आरोपीसह 12 आरोपितांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आलेले असून फरार आरोपितांचा व त्यांचे एजंटचा शोध सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस उपअधीक्षक सिध्दार्थ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलिस अंमलदार गोकुळसिंग कायटे, समाधान तेलंग्रे, किरण चव्हाण, अंबादास साबळे, गजानन भोसले, सागर बावीस्कर, दत्ता वाघुंडे, विष्णू कोरडे, ज्ञानेश्वर खुने, रवींद्र गायकवाड, शुभम तळेकर, श्रेयस वाघमारे, चालक पाठक मेजर, महिला अंमलदार, जया निकम, निमा घनघाव, मंदा नाटकर यांनी केली आहे.
फरार आरोपींचा शोध
जालना जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यांत झालेल्या नैसर्गिक आपत्ती घोटाळ्यात अद्यापही काही आरोपी फरार असून त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाचा संपूर्ण तपास लागणार आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्यावतीने फरार आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.