जालना : शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील बंद फ्लॅटमध्ये भरदिवसा घरफोडीची खळबळजनक घटना गुरुवार दि. 9 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली आहे. राजस्थानला गेलेल्या एका व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेसह 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. अवघ्या चार तासांच्या अंतरात ही चोरी झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेनाराम मिठाराम सोळंके (रा. संतोषी माता मंदिर परिसर, जालना) हे 9 एप्रिल रोजी सकाळी आपल्या कुटुंबासह राजस्थानला गेले होते. त्यांनी घराची जबाबदारी शेजारीच राहणारे त्यांचे भाऊ अशोककुमार सोळंके यांच्यावर सोपवली होती. दुपारी 12 वाजेपर्यंत घर सुरक्षित होते, मात्र सायंकाळी 4 च्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले अशोककुमार यांच्या निदर्शनास आले.
घरात प्रवेश केला असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाट फोटून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आदी 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोककुमार सोळंके (40) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कपाटातून ऐवज लंपास
चोरट्यांनी घरातील तिजोरी फोडून त्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे झुमके (अर्धा तोळा), 5 हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण, 10 हजार रुपये किमतीची चांदीची सात नाणी आणि 5 हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण 80 हजार रुपयांचा माल लंपास केला.